
सामना प्रतिनिधी । नगर
लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार असून, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुत्र डॉ. सुजय विखे यांच्यापाठोपाठ राधाकृष्ण विखे-पाटील हेदेखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. नगरमध्ये होणाऱया शिवसेना-भाजप महायुतीच्या सभेमध्ये विखे-पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. विखे-पाटील यांच्यासह काही आमदारही ‘कमळ’ हाती घेणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र, नगरमध्ये आपण सुजय विखेंविरोधात म्हणजेच भाजपविरोधात प्रचार करणार नाही, हे विखे यांनी पूर्वीच स्पष्ट केले होते. आता ते स्वतःच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने नगरमधील समीकरणेच बदलणार आहेत.
दरम्यान, डॉ. सुजय विखे यांच्या मातोश्री जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे-पाटील यांनीही गुढी पाडव्यापासून मुलाच्या प्रचारासाठी दौरे सुरू केले आहेत. सुजयचे पालकत्व स्वीकारा आणि दक्षिण भागाच्या विकासासाठी त्याला खासदार म्हणून निवडून द्या, अशी भावनिक साद त्या मतदारांना घालीत आहेत.






























































