
भरदिवसा फायटर सारख्या लोखंडी हत्याराने मारहाण करून तरूणाला लुटल्याची घटना पुणे येथे सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंपाजवळ नुकतीच घडली.
याप्रकरणी किरण मारूती शिंदे (वय 32, रा. बिबवेवाडी) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण 18 मार्चला सकाळी साडेअकराच्या सुमारास भापकर पेट्रोल पंपाजवळील सिग्नलवर थांबले होते. त्यावेळी उजव्या बाजूला असलेल्या चारचाकी गाडीतून आलेल्या एका व्यक्तीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली असता, मी कोण आहे हे तुला दाखवतो असे म्हणून तक्रारदार यांना गाडी थांबवण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपीने तक्रारदार यांना शिवीगाळ करून फायटरसारख्या लोखंडी हत्याराने मारहाण करून जीवे ठार करण्याच्या उद्देशाने जखमी केले.
तसेच तक्रारदार यांच्या शर्टच्या खिशातील रोकड व गळ्यातील 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा 41 हजार रुपयांचा ऐवज हिसकावून पळ काढला. वैद्यकीय कारणास्तव किरण यांनी तक्रार द्यायला उशीर झाल्याचे पोलिसांना सांगितले. दत्तवाडी पोलीस तपास करत आहेत.




























































