
एटीएम सेंटरमधील बॅटऱ्यांची चोरी करताना संशय येउ नये म्हणून सुरक्षारक्षकाचा ड्रेस घालून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना खडक पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मोटार आणि बॅटऱ्या मिळून 2 लाख 30 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यांनी यापुर्वी अकोला, पिंपरी-चिंचवड, चंदनगर, नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 16 गुन्हे केले आहेत. भगवान विश्वनाथ सदार (वय 38, रा. पिंपळे गुरव, मूळ-चतारी, पातूर, अकोला) आणि जगदीश जगदेव हिवराळे (वय 30, रा. बालापूर, अकोला ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहू चौकातील एटीएम सेंटरमधील बॅटऱ्यांची चोरी करणारे सराईत घोरपडे पेठेत थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी बंटी कांबळे आणि समीर माळवदकर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी भगवान आणि जगदीशला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी बॅटऱ्यांची चोरी केल्याची कबुली दिली. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे, सहायक पोलीस निरीक्षक सुशील बोबडे, पोलीस उपनिरीक्षक रतिकांत कोळी, विनोद जाधव, गणेश सातपुते, संदीप पाटील, अमेय रसाळ, रवी लोखंडे, रोहन खैरे, योगेश जाधव, विशाल जाधव, दीपक मोधे, अजिज बेग यांच्या पथकाने केली.
दिवसाढवळ्या नागरिकांसमोर करीत होते चोरी
भगवान आणि जगदीश एकाच तालुक्यातील असून दोघेही पुण्यात कामानिमित्त होते. चार वर्षांपुर्वी भगवान एटीएम सेंटरमध्ये सुरक्षारक्षकाचे काम करीत होता. त्यामुळे त्याला एटीएमच्या बॅटऱ्यांनी माहिती होती. काही महिन्यानंतर काम सुटल्याने तो जगदीशच्या मदतीने बॅटऱ्यांची चोरी करु लागला. त्यासाठी सुरक्षारक्षकाचा ड्रेस घालून दिवसाढवळ्या नागरिकांसमोर एटीएम सेंटरमधील बॅटऱ्या चोरीचा उद्योग त्यांनी सुरु केला होता. सुरक्षारक्षक असल्यामुळे नागरिकांचे दोघांकडे लक्ष जात नव्हते. त्यामुळे त्यांचे फावले होते. अखेर खडक पोलिसांच्या तगड्या नेटवर्कमुळे दोघांना बेड्या घालण्यात आल्या आहेत.



























































