पुण्यात असेही प्रामाणिक चोरटे; शॉपी फोडली, पण एकाही बिअरला हात लावला नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाउन काळात पुणे शहरात वाईनची दुकाने फोडून दारूच्या बाटल्यांची चोरीच्या काही घटना घडल्या होत्या. अशीच एक घटना खडकवासला परिसरात घडली आहे. चोरट्यांनी तीन दुकाने फोडली. त्यामध्ये बिअर शॉपीचाही समावेश आहे.

मात्र, गल्ल्यातील किरकोळ आठशे ते हजार रुपयाची रक्कम चोरून नेत त्यांनी एकाही बियर बाटलीला हात लावला नाही. त्यामुळे पुण्यातील प्रामणिक चोरट्यांची चर्चा रंगली आहे.

चोरट्यांनी खडकवासला परिसरातील साई कार डेकोर, रुबाबदार क्लॉथ सेंटर आणि स्वागत बिअर शॉपी अशी तीन दुकाने एकाच रात्री फोडली.  साई कार डेकोर या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा असल्यामुळे तेथील चोरी कॅमेर्‍यात कैद झाली. तोंड बांधलेल्या अवस्थेतील तीन चोरटे चोरी करताना दिसत आहेत. त्यानंतर चोरट्यांनी बिअर शॉपीकडे मोर्चा वळविला. त्यांनी स्वागत बिअर शॉपीचे शटर उचकटून आत प्रवेश केला.

गल्ल्यातील रक्कम चोरली. मात्र, शॉपीतील एकाही बिअरच्या बाटलीला हात लावला नाही. चोरटे रुबाबदार क्लॉथ सेंटरचे ग्रुप सोडून शटर उचलण्याचा प्रयत्नात असताना  आवाज झाल्यामुळे दुकानमालक जागे झाले. त्यांनी धाव घेतल्याने चोरट्यांनी पळ काढला. संबंधित व्यवसायिकांनी याची माहिती हवेली पोलिसांना दिली आहे.