Pune Video – तीन बिबटे, गोठ्यात झोपलेल्या वासरावर हल्ला; शेतमजुराच्या सतर्कतेमुळे धुम ठोकली

आंबेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथील शेतकरी सुखदेव मार्तंड शेटे यांच्या घरासमोर पहाटेच्या वेळी तब्बल तीन बिबटे एकाच वेळी फिरताना आढळले आहेत. विशेष म्हणजे एका बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला केला मात्र जवळच झोपलेल्या शेतमजुराने काठीने प्रतिकार केल्याने वासरू बचावले आहे. हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

श्री क्षेत्र वडगाव येथील शेटेमळा परिसरात शेतकरी सुखदेव शेटे राहतात. त्यांच्या घराच्या आजूबाजूला शेती आहे. तसेच घरालगत गोठा असून तेथे पाच दुभत्या गाई व त्यांची वासरे बांधण्यात आली आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने घराच्या बाहेर व गोठ्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. यापूर्वी एकदा गोठ्यातील वासरावर हल्ला करून बिबट्याने त्याला ठार केले होते. बुधवारी (23 जुलै 2025) पहाटे दीडच्या सुमारास तब्बल तीन बिबट्यांनी एका मागोमाग येत शेटे यांच्या ओट्यावर प्रवेश केला. हे बिबटे इकडे तिकडे पाहत संथ गतीने चालत होते. त्यानंतर त्यातील एका बिबट्याने त्यांचा मोर्चा गोठ्यात असलेल्या वासराकडे वळविला. विशेष म्हणजे वासरू जेथे बांधले होते तेथे जवळच एक शेतमजूर खाटेवर झोपला होता. दबा धरून आलेल्या बिबट्याने खाली बसलेल्या वासरावर मागून झडप घातली. त्यावेळी वासरू खडबडून उठले या आवाजाने मजूर जागा झाला. त्याने अंगावर असलेले पांघरून बिबट्याच्या दिशेने फेकले तसेच जवळ पडलेली काठी खाटेवर मारत मोठ्याने आरडाओरडा केला. त्यामुळे हल्ला करण्यासाठी आलेल्या बिबट्याने तेथून धूम ठोकली आहे. हा मजूर बराच वेळ जागा राहून भेदरलेल्या अवस्थेत बसला होता. सुदैवाने बिबट्यांनी त्याच्यावर हल्ला केला नाही. या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर असून अनेक पाळीव जनावरे त्यांनी ठार केली आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन खात्याने तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

वडगाव काशिंबेग येथे एकाच वेळी तीन बिबटे आढळल्याची माहिती मिळाली आहे. त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार आहोत तसेच योग्य त्या उपयोजना करू. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर उघड्यावर झोपू नये. घराभोवती रात्रीच्या वेळी योग्य प्रकाश राहील याची काळजी घ्यावी. बिबट्या दिसल्यास त्याला चिडवू नये. अन्यथा तो परत हल्ला करू शकतो, अशी माहिती नवपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी दिली आहे.