पुणे – वारजेत हॉटेलमध्ये राडा घालणाऱ्या तिघा सराईतांना अटक

हॉटेल बंद झाल्यानंतर जेवण न दिल्याच्या रागातून सराईतांनी राडा घालून तिघा कामगारांवर वार करीत गंभीररित्या जखमी केले. त्याशिवाय हातात कोयते नाचवित दहशत निर्माण करून हॉटेलमधील रोकड चोरून नेली. ही घटना १३ नोव्हेंबरला मध्यरात्री सव्वाएकच्या सुमारास वारजेतील साइसरिता हॉटेलमध्ये घडली.

मंगेश विजय जडीतकर (वय 23, रा. पाटीलनगर, शिवणे) सौरभ प्रकाश मोकर (वय 22 रा. उत्तमनगर), शुभम अनिल सुद्देवार (वय 25 रा. वारजे ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. नदीम खान, समाधान ओव्हाळ, विकास झुंजार अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. चंद्रकांत वरवटे वय ४६ यांनी वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

वारजे ब्रीज परिसरात साईसरिता हॉटेल असून 13 नोव्हेंबरला मध्यरात्री एकच्या सुमारास सराईत टोळके तेथे गेले. त्यावेळी हॉटेल बंद झालेले असतानाही त्यांनी जेवणाची मागणी केली. मात्र, हॉटेल मालकाने जेवण देण्यास नकार दिल्यामुळे रागातून टोळक्याने साहित्याची तोडफोड केली. त्याशिवाय तिघा कामगारांवर वार करून गंभीररित्या जखमी करीत गल्ल्यातील साडेतीन हजारांची रोकडे चोरून नेली. याप्रकरणी वारजे पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके, पोलीस उपनिरीक्षक बागल यांच्या पथकाने केली.