
हॅलो… मी रुपा बोलतेय…असा व्हॉट्सअॅप मेसेज करुन मैत्री वाढवित एका महिला सायबर चोरट्याने जेष्ठ नागरिकाला 1 लाख 40 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना 8 ते 22 ऑगस्ट कालाधवीत गुलटेकडीत घडली. याप्रकरणी एका 55 वर्षीय नागरिकाने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नागरिक एका खासगी कंपनीत कामाला असून गुलटेकडी परिसरात राहायला आहे. कामावर असताना त्यांना 8 ऑगस्टला एका महिलेने व्हॉट्सअॅप मेसेज करुन रुपा बोलत असल्याची बतावणी केली. त्यानंतर महिलेने नागरिकाशी मैत्री करीत संभाषण वाढविले. दरदिवशी महिलेने नागरिकाला व्हॉट्सअॅप करुन त्यांच्याशी गोड बोलत खोटी मैत्री केली. त्यादरम्यान महिलेने विविध कारणांसाठी नागरिकाकडून वेळोवेळी 1 लाख 40 हजार रुपये ऑनलाईनरित्या स्वःच्या बँकखात्यात जमा करुन घेतले. महिलेकडून सातत्याने पैशांची मागणी केली जात असल्यामुळे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर नागरिकाने स्वागरेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक शब्बीर सैय्यद अधिक तपास करीत आहेत.
































































