
कुटुंबातुन वेगळे राहण्याचा अट्टाहास करणाऱ्या पत्नीसह तिच्या आई-वडील व भावाकडून झालेल्या मारहाणीमुळे आणि सातत्याने होणाऱ्या मानसिक छळास कंटाळून जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी धनकवडीत घडली. शरद नरेंद्र भोसले (वय 30, रा.दौलतनगर सोसायटी, धनकवडी) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी प्रियांका भोसले, सासु रोहिणी शंकर भोसले (वय 50), सासरा शंकर शिंदे (वय 56) व मेव्हणा मनीष ऊर्फ गणेश शंकर शिंदे (वय 27, सर्व. रा.कवडीपाट, लोणी काळभोर) यांच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेंद्र भोसले (वय 58) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
शरद भोसले यांचे धनकवडी येथे हॉटेल होते. त्यांचा 2017 मध्ये प्रियांकाशी विवाह झाला होता. ते पत्नी, मुलगी व आई-वडीलांसह धनकवडीमध्ये राहात होते. पत्नी प्रियांका हि तिच्या आई- वडीलांच्या सांगण्यावरुन पतीच्या कुटुंबापासून वेगळे राहण्यासाठी अट्टाहास करीत होती. त्यावरुन त्यांच्यात सातत्याने भांडणे सुरू होती. पत्नीने या प्रकाराबाबत तिचा भाऊ गणेशला सांगितले. गणेशने भांडणे मिटविण्यासाठी भोसले यांना मार्केट यार्ड येथे बोलावले. त्यानंतर त्यांना तेथे शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर गणेशने पुन्हा शरद व त्यांच्या वडीलांना हडपसर येथील हांडेवाडी परिसरात बोलावून दोघांनाही शिवीगाळ करीत मारहाण केली होती. त्यामुळे मानसिक व शारिरीक त्रासाला कंटाळून शरद भोसले यांनी त्यांच्या धनकवडी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.






























































