डीजीपींची उचलबांगडी, पंजाबच्या पोलीस महासंचालकपदी व्ही. के. भवरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाब विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच सरकारने पोलीस महासंचालक सिद्धार्थ चट्टोपाध्याय यांची उचलबांगडी करत त्यांच्या जागी व्ही. के. भवरा यांची नेमणूक केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीबाबत डीजीपींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून या हलगर्जीपणामुळेच त्यांची बदली करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

पंजाब विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या सरकारने आयपीएस अधिकाऱ्यांची नावे यूपीएससी पॅनलकडे पाठवली. त्यापैकी 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी व्ही. के. भवरा यांची डीजीपीपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे भवरा यांच्या नेतृत्वाखाली पंजाब पोलीस विधानसभा निवडणुकीची सुरक्षा पाहणार आहेत. डीजीपींपाठोपाठ एसएसपी हरमनदीप हंस यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर नरिंदर भार्गव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यूपीएससीच्या पॅनलमध्ये 1987 बॅचचे आयपीएस दिनकर गुप्ता आणि व्ही. के. भवरा यांच्यासह 1988 च्या बॅचचे प्रबोधकुमार या तिघा अधिकाऱ्यांची नावे होती. त्यापैकी दिनकर गुप्ता आणि प्रबोधकुमार यांनी पेंद्रात प्रतिनियुक्तीवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी राज्याचे डीजीपी म्हणून व्ही. के. भवरा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.