
पाच राज्यांच्या निकालामुळे देशात राजकीय वातावरण तापले असतानाच मंगळवारी रात्री पंजाब दोन स्फोटांनी हादरले. जालंधर येथे सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयाच्या गेटवर पहिला स्फोट झाला, तर दुसरा स्फोट अमृतसर येथे लष्कराच्या खासा तळावर झाला. या स्फोटामुळे प्रचंड घबराट उडाली. यात एक जण जखमी झाला. पोलीस आणि लष्कराने दोन्ही घटनास्थळांचा ताबा घेतला असून पुढील तपास सुरू आहे.
जालंधर येथील बीएसएफ मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पार्क करण्यात आलेल्या ऑक्टिव्हाचा रात्री आठ वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. यात गुरप्रीत सिंग हा 22 वर्षीय तरुण किरकोळ जखमी झाला. स्फोट झालेली स्कूटर त्याचीच होती. स्कूटर पार्क करून तो निघत असतानाच हा स्फोट झाला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतर अवघ्या तीन तासांत सुमारे पावणेअकराच्या सुमारास अमृतसर येथील खासा लष्करी तळावर दुसरा स्फोट झाला. हा ग्रेनेड हल्ल्याचा प्रयत्न होता, मात्र ग्रेनेड भिंतीवर आदळल्याने त्याचा स्फोट झाला.
जालंधर स्फोटाची जबाबदारी खलिस्तान लिबरेशन आर्मी नावाच्या संघटनेने स्वीकारली आहे, मात्र पोलिसांना याबाबत संशय असून या स्फोटामागे नेमके कोण आहे याचा तपास सुरू आहे. राज्याचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी बुधवारी सकाळी दोन्ही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर यात आयएसआयचा हात असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला.
एनआयएचे पथक पंजाबला रवाना
पंजाबमधील स्फोटांचा तपास हाती घेण्याच्या हालचाली राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सुरू केल्या आहेत. एनआयएचे पथक पंजाबला रवाना झाले असून राज्य पोलिसांच्या सहकार्याने ते तपास करणार आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, विविध वस्तूंचे तुकडे, स्फोटकांचे नमुने गोळा करण्यात येत आहेत. या सगळय़ाच्या आधारे स्फोटाचे धागेदोरे जोडण्यात येत आहेत.
ही भाजपची निवडणुकांची तयारी; मुख्यमंत्री भगवंत मान यांचा आरोप
अमृतसर आणि जालंधर स्फोटांसाठी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भाजपला जबाबदार धरले आहे. ‘ही भाजपची पंजाबच्या निवडणुकांची तयारी आहे,’ असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. ‘भाजपची काम करण्याची ही पद्धत आहे. एखाद्या राज्यात निवडणूक लागली की तिथे दंगली घडवायच्या, छोटे-मोठे बॉम्बस्फोट घडवायचे, जातीधर्माच्या नावावर लोकांमध्ये भांडणे लावायची असे उद्योग भाजप करतो. हा त्याचाच भाग आहे. भाजपने हे सगळे उद्योग बंद करावेत,’ असे मान म्हणाले.




























































