
कोराना कर किंवा उपकर लावण्याचा कोणताही विचार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज स्पष्ट केले. येथील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. दरम्यान, आयडीबीआयपाठोपाठ केंद्र सरकारने आणखी दोन बँकांचे खासगीकरण करण्याचे ठरवले आहे. मात्र त्याबाबत अर्थमंत्र्यांनी मौनच बाळगले. कोरोना काळात जगातील अर्थव्यवस्था संघर्ष करीत असताना हिंदुस्थानने मात्र यातून बचावाचा मार्ग शोधला. प्रथमच करदात्यांच्या पैशांचा वापर योग्य पद्धतीने केला, असे निर्मला सीतारामन म्हणाल्या.
पंजाब नॅशनल आणि बँक ऑफ बडोदा
देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्टेट बँकेसारख्या 20 संस्था असण्याची आवश्यकता आहे, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर बँकांच्या खासगीकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून 1 लाख 75 हजार कोटी रुपये जमा करण्याचे मोदी सरकारचे लक्ष्य आहे. आयडीबीआय बँकेपाठोपाठ आणखी दोन बँकांचे खासगीकरण होईल, अशी अटकळ आहे. त्यात पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा या दोन बँकांची नावे आघाडीवर आहेत.
– कोरोना कर लावण्याची मीडियात चर्चा सुरू झाली, पण ती का झाली याची मला माहिती नाही. परंतु असा कोणताही कर लावण्याचा कधीही विचार केला गेला नाही, असे निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले.
































































