
पंजाबच्या बरनाला शहरात अक्षय कुमारचा नवीन चित्रपट सूर्यवंशीला जोरदार विरोध होताना दिसत आहे. चित्रपटाचे पोस्टर फाडून त्यांनी निषेध केला आहे.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या संघर्षामुळे हा विरोध होत आहे. बरनाला येथे शनिवारी भारतीय किसान यूनियन कादियां या संघटनेने चित्रपटगृह आणि मॉलसमोर निदर्शन करत चित्रपटाची पोस्टर्स फाडली.
या वेळी मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले होते. या निदर्शन करणाऱ्या शेतकऱ्यांनी, केंद्र सरकारतर्फे कृषी कायद्यांविरोधात हे निदर्शन आहे. या चित्रपटाचा नायक असलेल्या अक्षय कुमारने कृषी कायद्याला समर्थन केलं आहे. त्यामुळे त्याच्या चित्रपटाला विरोध करत असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी मांडली आहे.
अक्षयने आतापर्यंत शीख व्यक्तिरेखा साकारून कोट्यवधी कमावले आहेत. पण, जेव्हा पंजाबची साथ द्यायची वेळ आली तेव्हा मात्र तो पंजाबच्या नागरिकांना सोडून सरकारची साथ देऊ लागला. त्यामुळे आम्ही त्याचा निषेध करत आहोत आणि आता अक्षयचे चित्रपट बॉयकॉट करत आहोत. जोवर कृषी कायदे रद्द होत नाहीत तोवर हा विरोध सुरू राहील, असं संघटनेचं म्हणणं आहे.



























































