पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 116 बोटींची खरेदी, आपत्कालीन परिस्थितीत बोटींचा आधार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हवामान व पर्यावरणातील बदलामुळे राज्याला वारंवार पूर, अतिवृष्टी व वादळाचा तडाखा बसत आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जाण्यासाठी राज्य सरकारने तब्बल 116 बोटी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या बोटींच्या खरेदीसाठी 4 कोटी 91 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.

मागील वर्षी जुलै महिन्यात रत्नागिरी जिह्यातील चिपळूण व खेडला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला होता. अनेक लोक घरांमध्ये अडकले होते.  नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी कोस्ट गार्डच्या बोटी मदतीसाठी बोलावल्या होत्या. त्याशिवाय बचावकार्यासाठी खासगी सहा बोटी, कस्टम व पोलीस खात्याची एक, नगर परिषदेच्या दोन आणि तहसील कार्यालयाच्या पाच बोटींची मदत घेतली होती. एनडीआरएफच्या पाच बोटी पूरग्रस्त भागात पोहोचल्या होत्या.

या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यात येणाऱया विविध आपत्तीचा सामना करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारकडून विविध उपाय योजण्यात येत आहेत. राज्यातील पूरस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद दल व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून बोटींची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार राज्याच्या महसूल व वन विभागाने राज्यातल्या विविध जिल्ह्यांच्या मागणीनुसार 116 बोटी विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.