पंधरा दिवसांपासून रेकी, हॉटेल महाराजात कट;पुर्णेकरांच्या हत्येसाठी पाच कोटींची सुपारी, सीबीआयमार्फत चौकशी करा, सुषमा अंधारे यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येसाठी पाच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याची व या हत्येचा कट पवार नगरच्या हॉटेल महाराजा येथे रचण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या हॉटेलचे सीसी टिव्ही तपासा आणि पुर्णेकर हत्याप्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत करा अशी मागणी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.

अंधारे यांनी आज पुर्णेकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. या प्रकरणात मीनाक्षी आणि राजेंद्र शिंदे यांची भूमिका तपासा, संबंधित व्यक्तींचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार आणि परस्पर संबंधांची चौकशी करा अशी मागणीही त्यांनी केली. हत्येच्या 302 कलमासारख्या गंभीर गुह्यात संशयित असताना मीनाक्षी शिंदे पत्रकार परिषद कशा घेत आहेत?, त्यांना अद्याप अटक का करण्यात आली नाही, त्या खुलेआम ठाणे पोलिसांसमोर कशा फिरत आहेत असा सवाल त्यांनी केला.

पुर्णेकर यांच्या हत्येपूर्वी पंधरा दिवस रेकी सुरू असल्याचा दावाही अंधारे यांनी केला. टल्ल्या, पप्प्या, मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे हे सगळे पवार नगरमध्ये एकत्र भेटले होते. या संदर्भात योग्य ती माहिती पोलिसांनी घ्यावी, सीसी टिव्ही फुटेज तपासावेत अशी मागणीही त्यांनी केली.

मीनाक्षी शिंदेंनी त्यावेळी सायबर पोलिसांकडे तक्रार का केली नाही?

मीनाक्षी शिंदे यांचा अश्लील शिवीगाळ करत धमक्या देतानाची क्लिप व्हायरल झाली होती. ही क्लिप एआय जनरेटेड आहे असा दावा त्यांनी  दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. त्याचा समाचार अंधारे यांनी घेतला. ती एआय ऑडिओ क्लिप आहे असे शिंदे म्हणतात मग आठ महिन्यांपूर्वी त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार का केली नाही असा सवालही अंधारे यांनी केला. यावेळी अंधारे यांनी ठाण्यात वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या पोलीस अधिकाऱयांची यादीच वाचून दाखविली.