विकासासाठी निसर्गाचा बळी का?

>>पुरुषोत्तम कृ. आठलेकर<<

आजकाल प्रकल्पाला होणारा विरोध का होतो हे व्यवस्थित पारदर्शकपणे जनतेला सांगणे, त्यामधील फायदे-तोटे आकडेवारीनुसार स्पष्ट करणे हे शासनाला जमत नाही. घिसाडघाईने जनतेच्या माथ्यावर प्रकल्प लादायचे ही वस्तुस्थिती आहे. प्रकल्प, विकास कोणाला नको असे नाही, परंतु त्यांनी मानवी जीवनावर तसेच पर्यावरणावर विपरीत परिणाम होणार असतील तर असे प्रकल्प कशाला हवेत? नाण्याच्या दोन बाजू असतात त्याप्रमाणे फायदे व तोटेही असतात. त्याप्रमाणे त्याची टक्केवारी तपासणे गरजेचे आहे. कोणताही प्रकल्प येण्याआधी भूसंपादन, बाधितांचे पुनर्वसन, रोजगार व आर्थिक मोबदला याबाबत घोषणा, आश्वासने ही कागदोपत्रीच राहिली आहेत हा आजवरचा इतिहास आहे. मागील काही वर्षांत कोकणात तीन मोठय़ा प्रकल्पांबाबत विरोध होत आहे. मुळातच कोकणाला निसर्गाने नैसर्गिक संपत्ती बहाल केली आहे. त्यामुळे कोकणाला ‘महाराष्ट्रातील कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखले जाते. अशा परिसरात आधी एन्रॉन, मग जैतापूर अणुऊर्जा आणि आता नाणार येथे तेलशुद्धीकरणाचा प्रकल्प. या प्रकल्पांमुळे कोणीही किती सांगितले तरी त्याचा पर्यावरणावर परिणाम हा होणारच. आज कोकणची सारी संपत्ती ही निसर्गावर अवलंबून आहे. नद्या, नाले, जंगले, डोंगर, दऱ्याखोऱ्या, प्राणी, झाडे या सर्व गोष्टींमुळे तेथे पर्यावरणाचा समतोल अबाधित आहे. तेथे असलेल्या बागबागायती, त्याला पूरक असे फलोद्यानाचे व्यवसाय, कोकणाला लाभलेला अथांग समुद्र, त्यावर असलेला पिढीजात मच्छीमारीचा व्यवसाय यावर नक्कीच परिणाम होणार आहेत. म्हणून विकास किंवा प्रकल्प नको ही भूमिकासुद्धा योग्य नाही. परंतु ज्या कोकण परिसराला निसर्गाचे नंदनवन म्हटले जाते तेथे अशा प्रकारचे  रासायनिक घटक असलेले प्रकल्प नक्कीच पर्यावरणाला हानी पोहोचवणारे आहेत आणि रासायनिक घटकांचे दुष्परिणाम आपल्याला कालांतराने समजत असतात. अशा प्रकल्पाच्या माध्यमातून तापमानाचे प्रमाण नक्कीच वाढणार आहे. एकीकडे ‘ग्लोबल वॉर्मिंग’च्या गोष्टी करत असताना आणि दिवसेंदिवस तापमानात होणारी वाढ लक्षात घेता हे प्रकल्प कोकणासारख्या परिसरात किती उपयुक्त आहे याचा विचार होणेही गरजेचे आहे. आज नैसर्गिक जीवसृष्टी व संपत्तींचा ऱहास होतोय व त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे हे लक्षात घेऊन आपण विविध उपक्रम, योजना राबवून सर्वांमध्ये व्यापक जनजागृती करत असताना अशा औद्योगिक प्रकल्पाचासुद्धा एका वेगळय़ा दृष्टिकोनातून विचार केला गेला पाहिजे. आज नैसर्गिक संपत्ती जतन करण्यास आपल्याला अपयश येत आहे ही वस्तुस्थितीसुद्धा नाकारून चालणार नाही. कोकण हे आपल्याला निसर्गाने दिलेला मोठा खजिना आहे. त्यामुळे तेथे पर्यावरणाचा समतोल असून प्रदूषण जरासुद्धा नाही. उद्या भविष्यात येथे वीजनिर्मिती, अणुऊर्जा व तेलशुद्धीकरणासारखे प्रकल्प कार्यान्वित झाले तर त्याचा पर्यावरणावर नक्कीच परिणाम होणार आहे. त्याचा मोठा फटका बागायतदार, मच्छीमार व्यावसायिक व सभोवतालच्या वातावरणावर होणार आहे. आज पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यामुळे हवामानावर होणारा परिणाम आपण अनुभवत आहोत. निसर्गाचे ऋतुचक्रसुद्धा बेभरवशाचे होऊ लागले आहे. स्वाभाविकच त्याचा शेती व्यवसायावर परिणाम होत आहे. तरीही नैसर्गिक संपत्तीविषयी म्हणावे तितके गांभीर्य नाही असेच म्हणावे लागेल. उद्योग, विकास, प्रकल्प हे झालेच पाहिजे. त्याशिवाय प्रगती होणार नाही, पण त्यासाठी निसर्गावर मात करणे हे धोकादायक आहे.