‘पुलदैवत’ दिनदर्शिका; बारा महिन्यांचे बारा पु. लं. व्यक्तिविशेष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर हा ‘तारखा आणि सुट्टय़ा’ पाहण्यापुरताच लोकांचा संबंध येणारा विषय, पण या दिनदर्शिकेवरसुद्धा लोकांना प्रेम करण्यासाठी भाग पाडलेय ते तुषार देसाई या भन्नाट कलाकाराने. तुषार शरद देसाई मूळचा मिरजेचा. सध्या पुण्यात पूर्ण वेळ चित्रकार म्हणून कार्यरत आहे. आपल्या कल्पक आणि अतीव सुंदर चित्रकारीने कलेला मूर्तरूप देत तुषारने ‘पुलदैवत 2024’ ही संकल्पना मांडत आगळीवेगळी दिनदर्शिका आणली आहे. मागील वर्षी ‘अशोक सराफ’ दिनदर्शिका, गेल्या वर्षी ‘वाग्विलासिनी’ (विविध नामवंत कवयित्री आणि त्यांच्या कविता) असे विषय घेऊन तुषारने दिनदर्शिका तयार केल्या होत्या. 2024 च्या दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानावर त्याच्या कल्पकतेमधून साकारलेले भाईंचे एक-एक पात्र आणि बाजूला त्यांच्या तोंडी असणारी त्यांची हुकमी-इरसाल वाक्ये आहेत. टेबलटॉप स्वरूपातील ही दिनदर्शिका सोशल मीडिया पेजद्वारे खरेदी करता येईल. नामू परिट, अंतू बर्वा, नंदा प्रधान, बापू काणे अशा वल्लींना रेखाटनातून मूर्तरूप दिले आहे. पु. लं. ची वाक्ये ही आपण कुठेही वाचत असलो तरी ती त्यांच्या आवाजात ऐकू येतात हा सर्व पु. लं. प्रेमींचा अनुभव. तुषारची अर्कचित्रे बघताना, दिनदर्शिका हाताळताना नेमके हेच जाणवते. हा 365 दिवसांचा आलेख नसून संग्रही ठेवावा असा मास्टरपीस आहे.

स्वतःच्या या वेगळय़ा प्रयोगाबाबत तुषार देसाई सांगतो, ‘‘मला पु. लं. ना भेटता आले नाही ही खंत कायमच आहे. आई, वडील आणि शिक्षकांनी केलेल्या संस्कारांपैकी ‘पु. लं. संस्कार’ हेदेखील तितकेच महत्त्वाचे. पु. लं. वर काहीतरी करायला मिळाले पाहिजे असे सतत वाटायचे. म्हणूनच दिनदर्शिकेचे तिसरे पुष्प ‘पुलदैवत’ संकल्पनेवर आधारित केले. ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पु. लं. च्या पुस्तकातील निवडक 12 वल्लींना चित्रांद्वारे साकारले. त्या वल्लींच्या तोंडी असणारे काही संवाद निवडले आणि दिनदर्शिका तयार झाली. सर्व पु. लं. रसिकांना मला पु. लं. मय करता आला याचाच आनंद आणि समाधान जास्त आहे.’’