
मुंबई इलाखा शहर विभाग सार्वजनिक बांधकाम विभागात गेली दहा ते बारा कर्षे काम करणाऱ्या ठेकेदारांची बिले काढण्यास टाळाटाळ केली जात असल्याची चर्चा बांधकाम विभागात आहे. माजी मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील नागपूरचे अधिकारी बिल काढण्यासाठी 20 ते 25 टक्क्यांपर्यंत मागणी करून दादागिरी करत असल्याची तक्रार पीडब्ल्यूडी कॉण्ट्रक्टर वेल्फेअर असोसिएशनने केली आहे.
बांधकाम विभागाच्या कामातील तीव्र स्पर्धेमुळे कमी दरात म्हणजेच बिलो रेट जाऊन कामे करावी लागतात. कंत्राटदार फार कमीमध्ये काम करीत आहेत. या तीव्र स्पर्धेमुळे आम्हाला बऱ्याच वेळा नुकसानही सहन करावे लागते. अशा परिस्थितीत येथील कार्यकारी अभियंता ठेकेदार लोकांना लक्ष्य करतात. आगाऊ करून घेतलेल्या कामाची वर्क ऑर्डर स्वतःकडे दाबून ठेवतात. जो कोणी त्यांच्या विरोधात जातो त्याला काम न देणे, पेमेंट न करणे, ऑफिसबाहेर ताटकळत बसून ठेवणे तसेच कंत्राटदाराचे जास्तीत जास्त नुकसान कसे करता येईल, अशा पद्धतीने काम करतात, अशी मुंबई शहर विभागात काम करणाऱ्या ठेकेदारांची तक्रार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पीडब्ल्यूडी कॉण्ट्रक्टर वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्राच्या वतीने तक्रार दिली आहे.



























































