मोबाईलवर स्कॅन करा; बोगस टीसी ओळखा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

काळा कोट घालून कोणीही रेल्वे प्रवाशांकडून दंड वसुली करीत असल्याच्या घटना वारंवार घडल्याने मध्य रेल्वेने अनोखी आयडियाची कल्पना लढविली आहे. मध्य रेल्वे टीसींच्या गळ्यात आता ‘क्यूआर’कोडवाले आयकार्ड लटकविणार आहे. त्यामुळे प्रवाशांना टीसी बोगस आहे की नाही ते क्षणार्धात मोबाईलवर क्यूआर कोड स्कॅन करताच समजणार आहे.

मध्य रेल्वेच्या विभागीय वाणिज्य व्यवस्थापक रॉबिन कालिया यांच्या संकल्पनेतून हे तंत्र तयार केले आहे. प्रवाशांनी आपल्या मोबाईलवरील पेटीएम, भीम ऍप वा इतर कोणत्याही ‘क्यूआर’ऍपद्वारे टीसींच्या गळ्यातील ‘क्यूआर’ कोड स्कॅन करताच सर्व्हरशी कनेक्शन होऊन मोबाईलवर लिंक ओपन होईल. लागलीच टीसींचे सर्व डिटेल्स मोबाईलवर झळकतील अशी एकंदर योजना आहे. त्यामुळे बोगस टीसीचे पितळ उघडे पडेल असा दावा केला जात आहे.

ठाण्यापासून ‘क्यूआर’ कोडचा प्रयोग

बोगस टीसींना पकडल्याच्या पाच ते सहा घटना घडल्यानंतर ठाण्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून 14 टीसींना हे ‘क्यूआर’कोडवाले आयकार्ड देण्यात आले आहे. खरे तर टीसींनी त्यांचा युनिफॉर्म घालण्याचे बंधनकारक करावे, त्यांचे ओळखपत्र मागताच त्यांनी ते निमूटपणे प्रवाशांना दाखवावे, टीसींच्या केबिनमध्ये तसेच ते उभे रहात असलेल्या भागात सीसीटीव्ही बसवावेत तरच नाहक वादविवाद टळतील असे रेल्वे कार्यकर्ते सुभाष गुप्ता यांनी सांगितले.