
>> उदय पिंगळे, अर्थ अभ्यासक
वाचकहो, आर्थिक गुंतवणुकीसह आर्थिक समस्यांसंदर्भातील तुमच्या मनातील प्रश्न, शंका [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवा.
माझा प्रश्न डी मॅट खात्याच्या संदर्भात आहे. रमा माधव यांचे संयुक्त डी मॅट खाते नियमित ब्रोकरकडे आहे. रमाचे नाव पहिले व माधवचे सहधारक म्हणून दुसरे नाव आहे. त्यात काही वर्षांपूर्वी घेतलेले चांगल्या कंपन्यांचे शेअर्स आहेत. त्यांना डिस्काऊंट ब्रोकरकडे खाते उघडायचे आहे. त्या खात्यातील होल्डिंगवर काय परिणाम होईल. – चंद्रकांत कुवळेकर, चांभार्ली, रायगड
उत्तर :
सध्याच्याच नावाच्या क्रमाने नवे खाते काढावे लागेल. फक्त रमाच्या नावाने खाते काढून जमेल, पण त्यासाठी ट्रान्सफर चार्ज लागेल. नवीन संयुक्त खात्यात शेअर्स वर्ग करण्यासाठी
डिपॉझिटरीकडे खात्यात असलेले होल्डिंग ट्रान्सफर करून डी मॅट खाते बंद करण्याचा अर्ज (ट्रान्सफर कम अकाऊंट क्लोजिंग फॉर्म) भरून द्यावा लागेल. कोणताही खर्च लागणार नाही. मालमत्तेची आर्थिक देवाणघेवाण होत नसल्याने कर द्यावा लागणार नाही.
माझे म्युच्युअल फंडासंदर्भात दोन प्रश्न आहेत – आनंद गिलडा, जालना
1) मी दर महिन्याला दहा हजार एसआयपी पाच वेगवेगळय़ा फंडांमध्ये पुढील चार/पाच वर्षांपर्यंत करण्याचा विचार करत आहे. यासाठी कोणत्या योजना निवडाव्या?
2) एसडब्ल्यूपीसाठी पाच लाख गुंतवणूक केल्यानंतर 20/30 हजार मंथली इन्कम मिळेल का आणि किती वर्षे मिळेल?
उत्तर :
1) आपण चार/पाच फंड योजनांत गुंतवणूक करू इच्छित आहात. मी गुंतवणूक सल्लागार नसल्याने योजना कोणत्या घ्याव्यात हे सुचवू शकत नाही. यासाठी व्यावसायिक गुंतवणूक सल्लागाराची मदत घेता येईल. याशिवाय सर्व योजनांचा तौलनिक अभ्यास करून मनीकंट्रोल, व्हॅल्युरिसर्च यांसारख्या विश्वासार्ह संकेतस्थळावर अग्रक्रमी योजनांची क्रमवारी मूल्यांकनाद्वारे (रेटिंग) दर्शवली जाते. यातील 5 स्टार हे सर्वाधिक रेटिंग असून यातील फंड आपण गुंतवणूक करण्यासाठी निवडू शकाल.
2) एसडब्ल्यूपीसाठी पाच लाख गुंतवणूक करून मासिक 20/30 हजार रुपये काढून घेतल्यास 18 ते 28 महिन्यांत सर्व फंड संपून जाईल. एकरकमी केलेल्या गुंतवणुकीतून दीर्घकाळात सर्वसाधारणपणे 12 टक्के परतावा मिळतो असे गृहीत धरल्यास त्यातून 6 टक्के म्हणजे दरमहा 2500/- काढून घेतल्यास दरमहा खर्चासाठी काही रक्कम मिळून भांडवल सुरक्षित राहील आणि भांडवली नफाही होत राहील.




























































