IND vs ENG – अश्विनचा अनोखा विक्रम, इंग्लंडविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा आशियातील पहिला गोलंदाज

रांचीत सुरू असलेल्या कसोटी लढतीत हिंदुस्थानचा फिरकीपटू आर. अश्विन याने अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. राजकोट कसोटीमध्ये कसोटी क्रिकेटमधील 500 विकेटचा टप्पा गाठणाऱ्या अश्विनने रांची कसोटीतही फिरकीची जादू दाखवली. अश्विनने धोकादायक ठरू पाहणाऱ्या जॉनी बेअरस्टोला फिरकीच्या जाळ्यात अडकवले. बेअरस्टोने 35 चेंडूत 38 धावा केल्या. ही विकेट घेताच अश्विनने खास विक्रमाला गवसणी घातली.

इंग्लंडविरुद्ध कसोटीमध्ये 100 विकेट्स आणि फलंदाजीत 1000 धावा करणारा आर. अश्विन आशियातील पहिला तर, एकूण चौथा खेळाडू ठरला आहे. याआधी अशी कामगिरी फक्त गॅरी सोबर्स, जॉर्ज गिफेन आणि मोंटी नोबल यांनाच करता आली आहे. या खास क्लबमध्ये आता अश्विनचीही एन्ट्री झाली.

इंग्लंडविरुद्ध 100 विकेट आणि 1000 हून अधिक धावा करणारे खेळाडू

गॅरी सोबर्स (वेस्ट इंडिज) – 3214 रन, 102 विकेट
मोंटी नोबल (ऑस्ट्रेलिया) – 1905 रन, 115 विकेट
जॉर्ज गिफेन (ऑस्ट्रेलिया) – 1238 रन, 103 विकेट
रविचंद्रन अश्विन (हिंदुस्थान) – 1085 रन, 100* विकेट