रेस्टॉरंटमध्ये जाताना जपून… अंधेरीच्या ‘राधाकृष्ण’ हॉटेलच्या 10 कर्मचाऱ्यांना कोरोना

मुंबईत कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे पालिकेने चाचण्यांची संख्या वाढवली असून अंधेरीच्या ‘राधाकृष्ण’ हॉटेलचे तब्बल 10 कर्मचारी एकाच वेळी पॉझिटिव्ह आढळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे निर्धास्तपणे हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये नाश्ता-जेवण्यासाठी जाताना आता सावधानता बाळगावी लागणार आहे. दरम्यान, हे हॉटेल पालिकेने तातडीने बंद केले आहे.

मुंबईत 10 फेब्रुवारीनंतर आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा एकदा वाढू लागला आहे. गेल्या आठवडाभरात सरासरी एक हजार रुग्ण दैनंदिन नोंदवले जात आहेत. त्यामुळे पालिवेने पुन्हा एकदा फेरीवाले, कामगार, कर्मचाऱयांची कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. याच मोहिमेत अंधेरीच्या एसव्ही रोडवरील राधाकृष्ण हॉटेलमधील 35 कर्मचाऱयांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये एकाच वेळी तब्बल 10 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे पालिकेने संबंधित हॉटेल पालिकेने सॅनिटाइझ करून सील केले आहे.

नेस्को सेंटरमध्ये क्वारंटाइन

‘राधाकृष्ण’ हॉटेलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या सर्व 10 कर्मचाऱयांना पालिकेने गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये सुरू केलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये क्वारंटाइन केले आहे. शिवाय बाधितांच्या निकट संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारेंटाइन करण्यात आले आहे.

या सर्वांची प्रकृती आता ठीक असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. संबंधित हॉटेल सॅनिटाइझ करून दोन दिवसांसाठी बंद करण्यात आले असून नवीन कर्मचारी आल्यानंतरच हॉटेल सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

अशी आहे नियमावली

फेब्रुवारीच्या सुरुवातीला कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आल्यामुळे हॉटेल, बार, रेस्टॉरंट, फूड कोर्ट सकाळी 7 वाजल्यापासून मध्यरात्री 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास पालिकेने परवानगी दिली. मात्र याच वेळी संबंधित ठिकाणी एकाच वेळी एकूण क्षमतेच्या 50 टक्केच ग्राहकांना प्रवेश देणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे, सॅनिटायझेशन ठेवणे, कर्मचाऱयांनी मास्क वापरणे असे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र याकडे अनेक ठिकाणी दुर्लक्ष होत असल्यामुळे पालिकेच्या माध्यमातून पथकाकडून धाड टाकून कारवाई केली जात आहे.

शुक्रवारची रुग्णसंख्या
मुंबई – 1,173, मृत्यू 3
राज्य – 10,216, मृत्यू 53

आपली प्रतिक्रिया द्या