राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या महायुतीमधील प्रवेशाची चर्चा जोमात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या महायुतीच्या प्रवेशाची चर्चा चांगलीच जोर धरू लागली आहे. त्यातच खासदार सुजय विखे यांनी वडिलांना मंत्री करायचे, असे सूचक वक्तव्य केल्यामुळे प्रवेशाच्या चर्चा आता रंगल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीमध्ये चांगलेच राजकीय समिकरणे बदलली गेली. नगर दक्षिणची जागा ही राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केल्यानंतर सुजय विखे यांना तिकीट न देण्याचा निर्णय राष्ट्रवादी आघाडीने घेतल्यानंतर सुजय विखे यांना भाजप प्रवेशाशिवाय पर्यांय उरला नव्हता. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्री राधाकृष्ण विखे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला व त्यामध्ये आघाडी ही यशस्वी झाली. लोकसभा निवडणुकीमध्ये आपण आघाडीचा प्रचार करणार नाही असे राधाकृष्ण विखे यांनी जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी नगरमध्ये मुलाच्या प्रचारार्थ रणनीती आखण्यास सुरुवात केली. स्थानिक पातळीवर बैठका भेटीगाठी यांना प्रामुख्याने जोर दिला. प्रत्येक तालुक्यात विखे यंत्रणा ही कार्यरत होतीच. मात्र, राधाकृष्ण विखे यांनी सुजय विखे यांच्या प्रचारार्थ चांगलीच मोट बांधली. स्थानिक पातळीवर शिवसेना, भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला सुरुंग लावला, माजी खासदार दिलीप गांधी यांची सुध्दा नाराजी राधाकृष्ण विखे यांनी दूर केली आणि याचा फायदा होऊन सुजय विखे मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला.

दरम्यान, विरोधीपक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे हे महायुतीत प्रवेश करणार अशी चर्चा गेल्या महिना भरापासून जोर धरु लागली. विखे यांनी राहुल गांधीच्या सभेच्या पूर्वी पदाचा राजीनामा देऊन काँग्रेसला त्यांनी एक प्रकारे खिंडीत पकडले. विरोधीपक्षनेते पद हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिले जाणार अशी चर्चा त्यावेळेला जोर धरु लागली. मात्र, विखे यांनी त्यानंतर कोणती प्रतिक्रिया दिली नाही. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर सर्वकाही बोलेल असे स्पष्ट केले होते. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राधाकृष्ण विखे यांनी बाळासाहेब थोरात व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विखे शैलीमध्ये चांगलाच खरपूस समाचार घेतला. त्यात खासदार सुजय विखे यांनी पहिल्यांदा वडिलांना मंत्री करायचे असे सुचक वक्तव्य केल्याने आता राधाकृष्ण विखे यांच्या महायुतीच्या प्रवशाची चर्चा नगर जिल्ह्यात चांगलीच जोरा धरु लागली आहे, त्यातच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नुकतेच जाहीर केल्यामुळे विखे यांच्या प्रवेशाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.