
शनिवारी दिवसभर पावसाने काहीशी उसंत घेतली असली, तरी सायंकाळपर्यंत 96 टक्के भरलेल्या राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. सर्वच नद्या अजूनही धोकापातळीवरून वाहत असल्याने कोल्हापूरकरांवर महापुराची टांगती तलवार कायम आहे. मध्यरात्री तीन वाजता पंचगंगेची 56.3 इंचापर्यंत रेकॉर्डब्रेक झालेल्या पाणीपातळीत घट होऊन सायंकाळी 8 वाजता 54 फुटांवर पोहोचली होती. दरम्यान, जिल्ह्यात भूस्खलनासह पुराचे पाणी हजारो घरांसह शेतांमध्ये घुसल्याने प्रचंड नुकसान झाले. एनडीआरएफचे जवान आणि स्थानिक स्वयंसेवक अविश्रांत पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करत असून, आतापर्यंत 42 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. शिरोळ तालुक्यात दुपारनंतर लष्कराच्या 65 जवानांच्या पथकाने बचाव व मदतकार्यास सुरुवात केली आहे.
गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात झालेल्या संततधार अतिवृष्टीमुळे लागोपाठ दोन दिवसांत 2005 आणि 2019च्या महापुराच्या पुनरावृत्तीचे संकट कोल्हापूरकरांवर ओढवले होते. 2019च्या महापुरात पंचगंगेची पातळी 55 फूट 6 इंच होती. त्यावेळी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले होते. मात्र, यंदा हे दरवाजे न उघडताच पंचगंगेची पातळी 56 फुटांवर पोहोचली होती. शिवाय पुढील 48 तास ऑरेंज अलर्ट दिल्याने महापुराची भयानकता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांची चिंता वाढली होती. शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाने उसंत घेतल्याने कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला. पावसाचा जोर ओसरला. शिवाय राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजेही संध्याकाळपर्यंत बंदच राहिले. परिणामी पंचगंगेची पातळी इंचाने कमी होऊ लागल्याने महापुराचा धोका कमी होऊ लागला आहे. पंचगंगेची पाणीपातळी दुपारी तीन वाजता 54.10, चार वाजता 54.7, पाच वाजता 54.5 तर 6 वाजता 54.5 फुटांवर स्थिर होती. तब्बल चार दिवसांनी आज सकाळी सूर्यदर्शन होऊन सर्वांसाठी आशेची किरणे निर्माण झाली होती. पावसाने दिलेली उसंत पूरग्रस्तांच्या स्थलांतरणासाठी उपयुक्त ठरली. निम्म्याहून अधिक कोल्हापूर शहराचा भाग पाण्याच्या विळख्यात असून, अनेक गावांना अजूनही पुराने वेढले आहे.
पुण्याच्या पोलीस कॉन्स्टेबलला वाचवले
पुणे येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र केरबा चौगुले हे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुलाची शिरोली येथून चारचाकी वाहनातून जात होते. पुराच्या पाण्यातून जात असतानाच पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यांचे वाहन काही अंतरावर वाहत गेले. गाडीचा दरवाजा उघडून गाडीवर आणि एका झाडाला धरून ते मदतीची प्रतीक्षा करत होते. स्थानिक तरुण तसेच मच्छीमार समीर सनदे याच्या मदतीने अथक प्रयत्नांनंतर तीन तासांनी त्यांना वाचविण्यात यश आले.
लष्कराकडून शिरोळ तालुक्यात बचावकार्य
लष्कराचे पथकप्रमुख मेजर एस. एस. बिस्ट यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यातील दत्तवाड, जुने व नवे दानवाड, राजापूर, खिद्रापूर, राजापूरवाडी, अकिवाट, बस्तवाड, मजरेवाडी, घोसरवाड, लाटवाडी, हेरवाड, कुरुंदवाड, तेरवाड, अब्दुललाट, शिरदवाड, शिवनाकवाडी आदी गावांत बचावकार्य मोहीम राबविण्यात येणार आहे. या बचावकार्यासाठी टाकळी येथील स्वराज्य ऍकॅडमी येथे लष्करी तळ उभारण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
लष्कर, एनडीआरएफचे युद्धपातळीवर बचावकार्य
पूरबाधित गावातील नागरिकांचा बचाव व त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी लष्कर व एनडीआरएफच्या 6 तुकडय़ा दाखल झाल्या असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. करवीर तालुक्यातील आंबेवाडी, चिखली, हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी, शिरोळ तालुक्यात बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत 43 हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.
मंडलिक फाऊंडेशनकडून पूरग्रस्तांना आपत्कालीन सेवा
कोल्हापूर शहरात तात्पुरते स्थलांतर निवारा केंद्रात स्थलांतरित झालेल्या सुमारे 550 पूरग्रस्तांच्या जेवणाची व्यवस्था शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्या पुढाकाराने लोकनेते सदाशिवराव मंडलिक इरिगेशन, ऑग्रिकल्चरल, एज्युकेशन ऍण्ड कल्चरल डेव्लहपमेंट रिसर्च फाऊंडेशनकडून सुरू करण्यात आल्याची माहिती खासदार मंडलिक यांनी दिली. यासाठी सेंट्रल किचन सुरु केले असून, येथूनच शहरातील विविध ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेल्या पूरग्रस्तांना नाष्टा व जेवणाची सोय करण्यात आली आहे.































































