राई-बावेली जंगल रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य, घसरून पडल्याने 27 दुचाकीस्वार जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राधानगरी तालुक्याच्या पश्चिम भागात गेले पाच दिवस पावसाने रिमझिम फेर धरला आहे. यापूर्वी झालेला वळीव आणि मृगाचा पाऊस यामुळे आल्हाददायक वातावरण तयार झाले आहे. जंगल परिसर नवे रूप घेऊन साद घालू लागला आहे; परंतु तिकडे जाणाऱया राई-बावेली मार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने 27 दुचाकी घसरून अपघात झाला आहे.

गगनबावडा तालुक्याला जोडणारा हा रस्ता राधानगरी तालुक्याच्या हद्दीत येतो. धामणी प्रकल्पस्थळी जाण्यास या जंगल रस्त्याचा मार्ग पक्का व्हावा म्हणून परिसरातील नागरिक गेल्या पंधरा वर्षांपासून मागणी करीत आहेत. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून या दोन किमीच्या रस्त्यास अलीकडेच मंजुरी मिळाली. परंतु, ऐन पावसात जून महिन्याच्या तोंडावरच कंत्राटदाराने खडी टाकून मुरूम टाकला असून, रिमझिम पावसाने या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने पाच दिवसांत 27 दुचाकीस्वार घसरून पडून किरकोळ जखमी झाले आहेत. दुचाकी वाहनांच्या चाकांत हा चिखल अडकून वाहने लॉक होत आहेत. वाहन निसटून एखादा मोठा अपघातही होऊ शकतो. यामुळे परिसरातील नागरिक कंत्राटदाराविरुद्ध संताप व्यक्त करीत आहेत. संबंधित खात्याचेही याकडे दुर्लक्ष असून, तातडीने यावर उपाययोजना करून लोकांची गैरसोय टाळावी, अशी वाहनधारकांची मागणी आहे.

ऐन पावसाच्या तोंडावर कंत्राटदाराने रस्त्यावर मुरूम टाकला. पावसाने याचा चिखल रस्त्यावर पसरल्याने वाहन चालवणे अवघड झाले आहे. दुचाकी या रस्त्यावरून चालवताच येत नाही, गेल्या काही वर्षांत राई, चौके, मानबेट, कंदलगाव व गगनबावडा परिसर पर्यटनासाठी प्रसिद्धीस आला आहे; परंतु या वर्षी रस्त्याची स्थिती पाहता या पर्यटनाला ब्रेक लागणार आहे.

– राहुल झिरमिरे, मुख्याध्यापक, वि. मं. कंदलगाव, ता. राधानगरी