
गेल्या दोन आठवडय़ांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यातच या पावसाने पिलावरेवाडी गावानजीक घोळ नावाच्या शेतात मोठे भूस्खलन होऊन शिवारातील भातशेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या पावसाचा अधिक फटका हा नदी-नाले, ओढय़ांशेजारी असणाऱया शेतीला मोठय़ा प्रमाणात बसला आहे. नदीकाठाची शेती पाण्याच्या प्रवाहाने अक्षरशः धुवून नेली असून, नदीकाठावराचे विद्युत पंप, विहिरींचेही नुकसान झाले आहे.
केळोशी बु. नजीकच्या पिलावरेवाडी येथील घोळ नावाच्या शिवारात मोठय़ा प्रमाणात भूस्खलन होऊन डोंगराचा बहुतांश भाग तीन ते चार फुटाने खाली सरकला आहे. त्यामुळे येथील चंदर रामा पिलावरे, विलास रामा पिलावरे व प्रकाश भाऊ पिलावरे या शेतकऱयांच्या भात पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या तीन शेतकऱयांची जवळपास अडीच हेक्टर जमीन तीन ते चार फुटांनी खचून ओढय़ाकडील बाजूला सरकत गेली आहे. या खचलेल्या जमिनीचा काही भाग दुसऱया शेतकऱयांच्या शिवारात धुवून गेल्याने त्यांच्याही शेतीचे नुकसान झाले आहे. तलाठी रणजित पाटील, सरपंच के. एल. पाटील, कृषी सहायक तानाजी परीट, यू. जी. नाधवडेकर, कोतवाल संतोष पाटील, पोलीसपाटील शशिकांत दिघे यांनी या ठिकाणचा पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी पाठवला आहे.
गेल्यावर्षी या परिसरात 895 मिलीमीटर इतका रेकॉर्ड ब्रेक पाऊस एका दिवसात पडल्यामुळे या परिसरातील माळवाडी, केळोशी, आपटाळ, माळवाडी, शिंदेवाडी परिसरामध्ये मोठय़ा प्रमाणात भूस्खलन झाले होते. यावर्षी अशाच पद्धतीचे भूस्खलन झाल्याने शेतकरी वर्गामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



























































