
स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदालने कारकीर्दीत चौथ्यांदा अमेरिका ओपन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरण्याचा पराक्रम केला. मात्र, रशियाच्या पाचव्या मानांकित डॅनिल मेदवेदेव याने त्याला जेतेपदाच्या लढतीत तब्बल 4 तास 50 मिनिटांपर्यंत झुंजविले. शेवटी या चुरशीच्या किताबी लढतीत अखेर नदालने बाजी मारून 19व्या ग्रॅण्ड स्लॅम किताबाला गवसणी घातली. राफेलची ही टेनिसमधील भरारी आता त्याचा चिरप्रतिद्वंद्वी रॉजर फेडररपर्यंत आली असून फेडररच्या 20 ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदाची बरोबरी करण्यापासून तो केवळ एक पाऊल दूर आहे.
मॅरेथॉन लढत
कारकीर्दीतील पहिलीच ग्रॅण्ड स्लॅम फायनल खेळणाऱ्या 23 वर्षीय डॅनिल मेदवेदेवने 34 वर्षीय राफेल नदालचा चांगलाच घामटा काढून मी केवळ अपघाताने अंतिम फेरीत पोहोचलो नाही हे टेनिस विश्वाला दाखवून दिले. नदालने ही लढत 7-5, 6-3, 5-7, 4-6, 6-4 अशी जिंकून विजयावर शिक्कामोर्तब केले. नदालने पहिले दोन सेट जिंकताना आपल्या लौकिकास साजेसा खेळ केला. मात्र, मेदवेदेवने जीवाची बाजी लावत पुढील दोन सेट जिंकून लढतीत चुरस निर्माण केली. मेदवेदेवचा प्रतिहल्ला बघून नदालच्या चाहत्यांमधील बेचैनी स्पष्टपणे दिसली. मात्र, दोन सेट गमावल्यानंतर नदालने आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत पाचवा सेट हातातून निसटणार नाही याची पुरेपूर काळजी घेत जेतेपदाला गवसणी घातली. नदालने कारकीर्दीत २८ व्यांदा ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. दुसरीकडे ग्रॅण्ड स्लॅम फायनल खेळणारा डॅनिल मेदकेदेक हा 2005 नंतरचा रशियाचा पहिला पुरुष टेनिसपटू होता. याआधी मराट सॅफिनने ऑस्ट्रेलियन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.
सर्वाधिक ग्रॅण्ड स्लॅम फायनल खेळणारे खेळाडू
खेळाडू फायनल जेतेपद उपविजेतेपद
रॉजर फेडरर 31 20 11
राफेल नदाल 28 19 08
नोवाक जोकोविच 25 16 09
इवान लेंडल 19 08 11
पीट सॅप्रास 18 14 04
दृष्टिक्षेपात
- अमेरिका ओपन चौथ्यांदा जिंकणारा राफेल नदाल चौथा टेनिसपटू. याआधी अमेरिकेचा जॉन मॅकेन्रोने चार वेळा, स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर व अमेरिकेचा पीट सॅप्रास यांनी 5-5 वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे.
- अमेरिका ओपन स्पर्धा 103 वेळा उजव्या, तर 25 वेळा डावखुऱ्या खेळाडूंनी जिंकली. या स्पर्धेत 1974 ते 84 पर्यंत डावखुऱ्या खेळाडूंचा बोलबाला होता. मात्र, 1985 ते 2009पर्यंत म्हणजे 24 वर्षे उजव्या खेळाडूंनी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. 2009मध्ये राफेल नदालने उजव्या खेळाडूंची मक्तेदारी मोडीत काढून ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला.
- 31 वर्षांत एकाही खेळाडूला चारही ग्रॅण्ड स्लॅम किताब जिंकता आलेले नाही. 1988मध्ये जर्मनीच्या स्टेफी ग्रॉफने वर्षातील चारही ग्रॅण्ड स्लॅम किताब जिंकण्याचा पराक्रम केला होता.
- चारही ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत अमेरिका ओपनमध्ये सर्वाधिक 408 कोटी रुपयांची पारितोषिके दिली जातात. फ्रेंच ओपनमध्ये 337 कोटी, ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये 307 कोटी, तर विम्बल्डन ओपनमध्ये 300 कोटी रुपयांची पारितोषिके दिली जातात.



























































