राफेल फायटर जेटची बॉडी आता हिंदुस्थानात बनवणार, दसॉल्ट आणि टाटा ग्रुप कंपनी यांच्यात करार

राफेल फायटर जेट विमान बनवणारी फ्रान्सची कंपनी दसॉल्ट एविएशन आणि टाटा ऍडव्हॉन्स्ड सिस्टम लिमिटेड यांनी हिंदुस्थानात राफेल लढाऊ विमानाची बॉडी तयार करण्यासाठी 4 प्रोडक्शन ट्रान्सफर करारावर स्वाक्षऱया केल्या आहेत. हा करार देशाच्या एअरोस्पेस निर्माण क्षमतेला आणखी मजबूत करण्यासाठी आणि जागतिक पुरवठा साखळीला मजबूत करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे दोन्ही कंपन्यांनी करारानंतर म्हटले आहे.

या ऐतिहासिक निर्णयामुळे हिंदुस्थानातील एअरोस्पेस निर्माण क्षमतेला मोठे प्रोत्साहन मिळणार आहे. फ्रान्सनंतर पहिल्यांदाच हिंदुस्थानात राफेल फायटर जेटच्या महत्त्वाच्या भागाचे निर्माण केले जाणार आहे. यामध्ये विमानाचा फ्युजलाज, मागील भाग, सेंट्रल फ्युजलाज आणि समोरचा भाग याचा समावेश आहे. याचे पहिले उत्पादन 2028 पर्यंत प्रोडक्शनमधून बाहेर पडेल, असा अंदाज आहे. हे उत्पादन बनवण्याचा कारखाना पूर्ण तयार झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला दोन फ्युजलाज तयार होतील, असे सांगण्यात येत आहे. राफेल फायटर जेटमध्ये फ्युजलाज विमानाचा मुख्य गाभा आहे. हे पायलट कॉकपिट, इंजिन, इलेक्ट्रॉनिक सिस्टम तसेच विंग्स आणि टेलला मदत करत असते. फ्युजलाज विमानाची स्थिरता, एअरो डायनामिक्स आणि रडार क्रॉस-सेक्शनला कमी करण्याचे काम करत असते. हे सर्व आता हिंदुस्थानात बनवले जाणार आहे.

राफेलच्या फ्युजलाजचे उत्पादन पहिल्यांदा फ्रान्सच्या बाहेर केले जाणार आहे. हे भारतात आमच्या सप्लाय चेनला आणखी मजबूत करण्याच्या दिशेने टाकलेले एक निर्णायक पाऊल आहे. ही सप्लाय चेन राफेलच्या यशस्वी निर्माण कार्यात योगदान देईल, असे दसॉल्ट एविएशनच्या सीईओ यांनी म्हटले आहे.