
केंद्र सरकारच्या आयात धोरणामुळे शेतकर्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. दररोज 12 शेतकरी आत्महत्या करीत असून ही बाब गंभीर आहे. सरकारने बदललेले सर्व कायदे शेतकरी विरोधी आहे, त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. कांदा निर्यात बंदीमुळे शेतकर्यांना विष पिण्याची वेळ आली, असे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केले.
12 डिसेंबर 2019 रोजी सांगली येथे शेतकरी हुतात्मा स्मृति परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासंदर्भात परिषदेत मांडण्यात येणार्या विविध मागण्यांबाबत येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रघुनाथदादा पाटील म्हणाले, साखर कारखान्याबाबत करण्यात आलेल्या संरक्षण कायद्यामुळे दोन कारखान्यात तिसरा कारखाना येऊ शकत नाही. त्यामुळे दोन साखर कारखान्यातील अंतराच्या अटीबाबत करण्यात आलेला कायदा उठविणे गरजेचे आहे. अन्यथा ऊस शेती टिकणार नाही. यावर्षी कारखाने दोन महिने चालले तर पुढील वर्षी एक महिन्यावर येतील. कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणात काटेमारी सुरु असून जवळपास तीन टक्के रिकव्हरीची चोरी करुन शेतकर्याची लुट सुरु आहे, असा आरोप रघुनाथदादा पाटील यांनी केला.
शेतकर्यांनी केलेल्या विविध आंदोलनानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. मात्र ज्या आंदोलनात जीवित व मालमत्तेची हानी झालेली नाही व पाच लाखापेक्षा अधिक मालमत्तेचे नुकसान झाले नाही. असे गुन्हे मागे घेण्याचे आदेश 13 जानेवारी 2015 मध्ये शासनाने जीआर काढून दिल्याचेही यावेळी रघुनाथदादा पाटील यांनी सांगून शेतकरी प्रश्नावर लढा देणार्यांना मन:स्ताप सहन करावा, लागत असून असे गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी केली.



























































