
रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रघुवीर घाटात आज पुन्हा दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कांदाटी खोऱ्यात वसलेल्या सुमारे 21 गावांच्या दळणवळणाचा मार्ग बंद झाला आहे. गेल्या दोन महिन्यातील दरड कोसळण्याची ही तिसरी घटना आहे. रघुवीर घाटात वारंवार दरड कोसळू लागली असल्याने कांदाटी खोऱ्यातील ग्रामस्थांची दळणवळणाचे गैरसोय होऊ लागली आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात येणाऱ्या कांदाटी खोऱ्यात शिंदी, वाळवण, आकल्पे यासारखी सुमारे 21 गावे आहे. महाबळेश्वर आणि कांदाटी खोरे यामध्ये कोयनेचे बॅकवॉटर असल्याने येथील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जायचे झाल्यास होडीतून कोयनेच्या बॅक वॉटरचा डोह पार करावा लागतो. पावसाळ्यात होडीतून जाणे शक्य होत नसल्याने पावसाळ्यात येथील ग्रामस्थांना रघुवीर घाट मार्गे खेड, पोलादपूर मार्गे महाबळेश्वर गाठावे लागते.
तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी कांदाटी खोऱ्यातील ग्रामस्थांना द्राविडी प्राणायाम करावा लागत असल्याने येथील ग्रामस्थ शासकीय काम वगळता अन्य दैनंदिन कामासाठी महाबळेश्वरला जाण्याऐवजी खेड तालुक्यात येणे पसंत करतात त्यामुळे रघुवीर घाट कांदाटी खोऱ्यातील ग्रामस्थासाठी दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. याच मार्गाने खेड आगाराची खेड-आकलपे, ही बस प्रवाशांची ने-आण करत असते.तर मुंबईहून या खोऱ्यात येणाऱ्या एस्टीच्या बसेस देखील राघायवीर घाटातूनच कांदाटी खोऱ्यात जात असतात.कांदाटी खोऱ्यातील अनेक गावांना उपयुक्त असणारा रघुवीर घाटाचा काही भाग गतवर्षीच्या अतिवृष्टीत ढासळला होता. त्यामुळे या घाटातील वाहतूक बंद करावी लागली होती. पावसाळ्यात कांदाटी खोऱ्यातील ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने ढासळलेल्या रघुवीर घाटाची डागडुजी करायला हवी होती मात्र बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने यावर्षी या खोऱ्यातील ग्रामस्थांना वारंवार दळणवळणाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही दिवसनपूर्वी घाटात कोसळली दरड बाजूला करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला तब्बल 36 तासाचा अवधी लागला होता. त्यामुळे कांदाटी खोऱ्यातील ग्रामस्थांना गावगतच अडकून पडावे लागले होते. खेड येथून आकाल्पे येथे गेलेली खेड आगाराची एसटी बस देखील कांदाटी खोऱ्यातच अडकवून पडली होती. 36 तासानंतर घाट मोकळा झाल्यावर अडकून पडलेली आकलपे खेड एसटी खेड अआगारात परतली होती.
घाटात दरड कोसळण्याची ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा घाटात दरड कोसळली आणि हा घाट पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद झाला. घाट बंद झाल्याने या खोऱ्यातील सुमारे 21 गावांचा जगाशी असलेल्या संपर्क पुन्हा एकदा तुटला,
दरड कोसळल्याची खबर मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराने मदतीने दरड काढण्याचे काम सुरु केले आहे मात्र मुसळधार पाऊस असल्याने दरड बाजूला करण्यात अडथळे येत आहेत.

























































