
राहुल मेहेंदळे– श्वेता मेहेंदळे
निळाशार समुद्र… तिचे स्वप्नील डोळे… निरागसता… राहूल-श्वेताचे खास क्षण.
- मधुचंद्र म्हणजे : एकमेकांना ओळखण्यासाठी असलेला काळ. लग्न ठरवून झाले असेल तर एकमेकांना समजून घेणं सोपं जातं. प्रेमविवाहामध्ये आपण आधी एकमेकांना ओळखत असतो. पण लग्नानंतर पुढचं आयुष्य कसं असेल याकरिता जो थोडा वेळ लागतो तो आपल्या घरी राहून, काम करत असताना आपल्याला मिळत नाही. त्याकरिता लग्नानंतर काही दिवसांसाठी बाहेर जातात आणि पुढील आयुष्याच्या योजना, ध्येय एकमेकांसोबत ठरवता येते. तो जो वेळ असतो त्याला मधुचंद्र असे म्हणू शकतो.
- फिरायला जाण्याचे प्लॅनिंग कसे केले? : आम्ही गोव्याला गेलो होतो. कारण शूटिंग चालू होती. त्यामुळे फार लांब जाता येत नव्हते. पटकन जाऊन येणं शक्य होतं, असे गोवाच वाटले. गोवा आम्हाला दोघांनाही आवडतं.
- आवडते ठिकाण? : कोलवा बीच.
- ठिकाणाचे वर्णन – गोवा म्हणजे सुशेगाद. काही घाई नाही. काही नाही. शांतपणे जगायचे. कुठल्याही प्रकारचे स्ट्रेस लाईफ नाही. मुंबईत आपली धावपळ असते, पण गोवा इतके शांत आहे की, तिथे खूप मस्त वाटतं. कसलाही ताण जाणवत नाही.
- मधुचंद्रासाठी शॉपिंग : तिथल्या मार्केटमध्ये जाऊन कपडय़ांची शॉपिंग केली होती.
- काही खास क्षण : त्यावेळी एकदा अख्खी संध्याकाळ वाळूत पहुडून आम्ही दोघांनी एकमेकांशी न बोलता समद्रकिनाऱ्याकड़े बघत घालवली होती. तो क्षण इतका सुखदायक आणि आनंददायक होता की, आम्हाला काही बोलायची गरजच लागली नाही.
- मधुचंद्र हवाच की… : हवाच. एकमेकांना समजून घ्यायला. मी तर म्हणतो मधुचंद्रापुरताच नाही, तर नवरा-बायकोने दरवर्षी बाहेर जायला हवे. लग्न जेव्हा होतं तेव्हाचं नातं, लग्नाला काही वर्षे झाल्यावर तेव्हाचं नातं, मुलंबाळं झाल्यावरचं नातं हे बदल नात्यांमध्ये होत असतात. त्यामध्ये सध्याच्या काळातला ताण-तणाव, धावपळ या सगळ्याचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव होत असतो. त्यामुळे दरवर्षी नवरा-बायकोने बाहेर फिरायला जावे. तो नात्याला स्ट्रेस बस्टर असतो. त्या सुट्टीची गरज प्रत्येक माणसाला असते.
- किती दिवस द्यावेत… : पाच-सहा दिवस पुरेसे आहेत. नोकरीमुळे सुट्टी मिळणं अवघड असतं. त्यात वेळ आणि पैसे असतील तर कितीही दिवस त्याचा आनंद घेऊ शकता.
- तिथला आवडलेला खाद्यपदार्थ : तिथला बोबिंलसारखा ‘चणक’ नावाचा मासा मला आवडला होता.
- अनोळखी ठिकाण की रोमॅन्टिझम : अनोळखी ठिकाण, रोमान्स हा तुमच्या मेंदूत असतो. तो कुठेही करता येतो, पण अनोळखी ठिकाणी आणखी मजा येते.
- जोडीदाराची खास आठवण : लग्न झालं तेव्हा ती खूप लहान होती. तिच्या डोळ्यात अगदी निरागस भाव होते. तिचे स्वप्नवत डोळे मी विसरू शकत नाही. त्यावेळचा चेहरा अजूनही स्मरणात आहे.
- मधुचंद्रानंतरचा संसारातील जोडीदार : श्वेता फार ग्रेट आहे. आमच्या लग्नाला पंधरा वर्षे होऊन गेलीयत. पण तिच्याकडून कायम सकारात्मक ऊर्जा मिळत असते. ती मनमिळाऊ आहे. सगळ्यांना फार समजून घेते. माझं काही चुकलं तर ती सांगते तिचं काही चुकलं तर मी सांगतो. त्यामुळे एकमेकांना समजून घेत आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे. छान आयुष्य जगतोय.

























































