
सामना प्रतिनिधी । बंगळुरू
हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या स्वरूपात बदल करण्याची जबादबारी पुन्हा एकदा ‘टीम इंडिया’चा माजी कर्णधार राहुल द्रविडवर सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. या अकादमीमधून अनेक उदयोन्मुख क्रिकेटपटू घडणार आहेत.
‘बीसीसीआय’ने अद्याप या निर्णयाची अधिकृत घोषणा केलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीनेही राहुल द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत बहुमोल योगदान देईल, असा विश्वास व्यक्त केला. राहुल द्रविडवर कोचिंग स्टाफच्या स्थापनेची जबाबदारी सोपविली जाणार आहे. ‘बीसीसीआय’ने यासाठी 22 प्रशिक्षकांची यादी तयार केली आहे. हे प्रशिक्षक देशातील विविध भागांत काम करून क्रिकेट स्तर उंचावण्यासाठी मदत करतील. युवा क्रिकेटपटूंवर अधिक फोकस करून त्यांना जास्तीत जास्त सामने खेळायला मिळाले पाहिजे असा राहुल द्रविडचा आग्रह आहे. 20 क्रिकेटपटूंची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसाठी निवड करायची. त्यातील 15 खेळाडूंची अंतिम निवड करून त्यांना घडविण्याचे काम केले जाईल. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गुणवत्तापूर्ण खेळाडू तयार करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचा राहुल द्रविडचा प्रयत्न असेल.
‘राहुल द्रविड मागील काही वर्षांपासून राष्ट्रीय ज्युनियर क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आहे. त्याने या संघात आमूलाग्र बदल केल्यामुळे द्रविडवर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या बदलाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. द्रविडला त्याच्या कल्पकतेनुसार या अकादमीत प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य असेल. तो नक्कीच या अकादमीला नव्या उंचीवर नेतील असा आम्हाला विश्वास आहे.’ – बीसीसीआय
























































