सहा वर्षांनंतर सोनिया गांधी रस्त्यावर उतरल्या; काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा कर्नाटकात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपण अनेक वादळे झेलली, अनेक आव्हाने परतून लावली. आपण दोघेजण हा देश एकजूट ठेवू.
– राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गेली 27 दिवस ‘भारत जोडो’ पदयात्रा सुरू आहे. सध्या कर्नाटकात ही यात्रा असून जनतेतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आज या पदयात्रेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीही सहभागी झाल्या. तब्बल सहा वर्षांनंतर सोनिया गांधी रस्त्यावर उतरल्या. 2016 मध्ये त्यांनी वाराणसी येथे काँग्रेसचा रोड शो केला होता. मात्र त्या रोड शो दरम्यान त्यांचा हात दुखावल्याने त्यानंतर त्यांनी रस्त्यावरील आंदोलनात सहभागी होणे थांबवले होते. मात्र आज काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेत त्या सहभागी झाल्या.

आई…

‘भारत जोडो’ यात्रेत आई आणि मुलामधील अतिशय प्रेमळ आणि भावनिक नाते पाहायला मिळाले. आईचा हात धरून राहुल गांधी चालताना दिसले. सोनिया गांधी यांच्या शूजची लेस निघाली. राहुल गांधी तत्काळ बसले आणि शूजची लेस बांधली. हा भावनिक क्षण कॅमेरात टिपला गेला.काँग्रेस पक्षाने आपल्या ट्विटर हँडलवर हा फोटो पोस्ट करताना ‘माँ’ अर्थात ‘आई’ अशी बोलकी कॅप्शन दिली आहे.

कॉँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार खरगे आज मुंबईत

कॉँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसा उमेदवारांचा प्रचाराचा जोरही वाढला असून या निवडणुकीत मतदान करणाऱया मतदारांच्या गाठीभेट त्यांनी सुरू केल्या आहेत. कॉँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत असणारे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे 7 ऑक्टोबर रोजी मुंबईत येत आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शशी थरूर 9 ऑक्टोबरला मुंबईत येणार आहेत. खरगे टिळक भवन येथे  संध्याकाळी पाच वाजता या निवडणुकीत मतदार असलेल्या राज्यातील नेत्यांशी संवाद साधणार आहेत.