
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. कोरोनाच्या दुसऱया लाटेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष ऑक्सिजनच्या पुरवठय़ाकडे नव्हते, तर बंगालकडे होते. लोकांचे प्राण पंतप्रधानांच्या अश्रूंमुळे नव्हे तर ऑक्सिजनचा पुरवठा करून वाचवता येऊ शकले असते, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर बोचरी टीका केली.
कोरोना महामारीतील व्यवस्थापनाच्या सावळ्यागोंधळावर बोट ठेवत राहुल यांनी ‘व्हाईट पेपर’ नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. कोरोनाच्या तिसऱया लाटेपासून वाचण्यासाठी देशाला मदत करणे हाच या ‘व्हाईट पेपर’मागील हेतू आहे. तिसऱया लाटेसाठी आपल्याला आधीपासूनच तयारी करावी लागेल. कोरोनाशी लढण्यासाठी लसीकरण हेच सर्वात मोठे शस्त्र आहे. सरकारला देशभरात गतीने लसीकरण मोहीम राबवावी लागेल. कोरोना विषाणू सातत्याने रूप बदलत आहे. तज्ञांनी दुसऱया लाटेचा आधीच इशारा दिला होता, मात्र त्यानंतरही केंद्र सरकार ढिम्म राहिले होते, असे राहुल यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले. त्यांनी दुसऱया लाटेतील सरकारच्या चुका निदर्शनास आणून देत तिसऱया लाटेपासून वाचण्यासाठी केंद्र सरकारला काही सूचना ‘व्हाईट पेपर’मधून केल्या आहेत. आधीच्या चुका सुधारूनच तिसऱया लाटेशी लढता येऊ शकते, असे ते म्हणाले.
तिसऱया लाटेशी लढण्यासाठी केंद्राला केलेल्या सूचना
- कोरोनाच्या तिसऱया लाटेशी लढण्यासाठी आतापासूनच तयारी करा. मागील चुकांची पुनरावृत्ती टाळा.
- ऑक्सिजन, बेड तसेच औषधांची टंचाई भासता कामा नये. प्रत्येक गाव-शहरात आरोग्यविषयक पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करा.
- कोरोना हा जीवशास्त्रीय नव्हे तर आर्थिक-सामाजिक आजार आहे. देशात ‘न्याय योजना’ राबवून गोरगरीब जनता तसेच छोटय़ा उद्योगधंद्यांपर्यंत थेट आर्थिक मदत पोहोचवा.
- कोरोनामुळे मृत्यू होणाऱया रुग्णांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी ‘कोविड भरपाई निधी’ तयार करा.
दुसऱया लाटेतील 90 टक्के मृत्यू रोखू शकलो असतो!
देशात कोरोनाच्या दुसऱया लाटेत मृत्यू झालेल्या 90 टक्के रुग्णांचे हकनाक बळी गेले. त्या लोकांना वाचवता येऊ शकले असते. आपल्या देशात ऑक्सिजनची कमतरता नाही. अनेक डॉक्टरांच्या मते जर त्या रुग्णांना वेळीच ऑक्सिजनचा पुरवठा केला असता तर त्यांचे मृत्यू टाळता येऊ शकले असते, असे नमूद करीत राहुल गांधींनी ऑक्सिजन पुरवठय़ातील केंद्राच्या उदासीनतेचा समाचार घेतला.
























































