संसदेत मतचोरीवर गृहमंत्र्यांचे उत्तर घाबरत आणि डिफेन्सिव्ह, राहुल गांधी यांचा टोला; पुन्हा म्हणाले मतचोरी सर्वात मोठा देशद्रोह

संसदेत आज सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक सुधारणांवर चर्चा झाली. लोकसभेत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीवरून केलेल्या आरोपांवर उत्तर दिलं. यावरच आता राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, “संसदेत मतचोरीवर गृहमंत्र्यांनी घाबरत आणि डिफेन्सिव्ह उत्तर दिले. डिजिटल मशीन-रीडेबल, पारदर्शी मतदार यादी देण्याबाबत एक शब्दही ते बोलले नाही. ईव्हीएमच्या आर्किटेक्चरच्या पारदर्शी ऑडिटवर घबराट निर्माण झाली आहे. भाजप नेते आणि कार्यकर्त्यांचे अनेक राज्यांत मतदान करणे, यावर काहीच उत्तर दिले नाही. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेतून सरन्यायाधीशांना बाहेर काढण्याबाबतही काहीच उत्तर दिले नाही.” ते म्हणाले, मी पुन्हा सांगतो मतचोरी हा सर्वात मोठा देशद्रोह आहे.