
आमच्या कुटुंबातील शेवटचा पंतप्रधान 30-35 वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर कुटुंबातील कोणीही व्यक्ती पंतप्रधान झालेली नाही. यूपीए सरकारमध्ये कोणी मंत्री नव्हते, असे प्रत्युत्तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज दिले.
भाजपकडून सातत्याने नेहरू-गांधी कुटुंबाला लक्ष्य करून परिवारवादाचे राजकारण असा आरोप केला जातो. यावर अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातील प्रोफेसर दीपेश चक्रवर्ती यांच्याशी डिजिटल संवाद साधताना राहुल गांधी यांनी भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आणि मोदी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली.
राहुल गांधी काय म्हणाले?
– माझे वडील राजीव गांधी 1984-89 या काळात पंतप्रधान होते. कुटुंबातील ते शेवटचे पंतप्रधान होते. 30-35 वर्षे झाली त्यानंतर गांधी कुटुंबातील कोणीही पंतप्रधान झालेला नाही.
– यूपीए सरकारच्या कार्यकाळातही आमच्या कुटुंबातील कोणीही मंत्री नव्हते.
– मी मूल्यांवर आधारीत राजकारण करतो. माझ्या काही कल्पना आहेत. मूल्यांसाठी मी लढत राहणार.
काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी कृषी कायदे
– केवळ काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी मोदी सरकारने सुधारित कृषी कायदे केले आहेत, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
– कृषी क्षेत्रात सुधारणा हव्यात पण कृषी क्षेत्रच उद्ध्वस्त करणाऱया या सुधारणा नकोत. त्यामुळे मोदी सरकारला कायदे मागे घ्यावेच लागतील.




























































