मी राहुल सावरकर नाही; माफी मागणार नाही

458

‘रेप इन इंडिया’ म्हटल्यामुळे भाजपवाले माझ्याकडे माफीची मागणी करीत आहेत; पण मी काहीही चुकीचे बोललो नाही. सत्य बोललो आहे. त्यामुळे मी माफी मागणार नाही. माफी मागायला मी राहुल सावरकर नाही. मी राहुल गांधी आहे, असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद सुरू झाला आहे.

सुधारित नागरिकत्व कायदा, डबघाईला आलेली अर्थव्यवस्था, देशभरात वाढत्या बलात्काराच्या घटनांविरोधात काँग्रेस पक्षाने राजधानी दिल्लीत रामलीला मैदानावर ‘भारत बचाव’ मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात राहुल गांधींनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली. दोन दिवसांपूर्वी झारखंड येथे विधानसभा निवडणूक प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी यांनी देशाची वाटचाल ‘मेक इन इंडिया’ नाही, तर ‘रेप इन इंडिया’च्या दिशेने सुरू असल्याचे म्हटले होते. त्यावर भाजपकडून राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, अशी मागणी होत आहे. यावर आज बोलताना राहुल गांधींनी मी माफी मागणार नाही. सत्य तेच बोललो होतो. माफी मागायला मी राहुल सावरकर नाही. राहुल गांधी आहे, असे विधान केले आहे.

पाच वर्षांत मोदींनी अदानींना 50 कंत्राटे दिली
n गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती अदानी यांना 50 कंत्राटे दिली. विमानतळे, बंदरांची एक लाख कोटींहून अधिक कामे दिली. काही दिवसांपूर्वीच 15 ते 20 लोकांचे 1 लाख 40 हजार कोटींचे कर्ज माफ केले. ही चोरी आणि भ्रष्याचार नाही तर काय आहे? असे टीकास्त्र्ा राहुल गांधींनी सोडले.
n ‘रेप इन इंडिया’ म्हटल्याबद्दल भाजपवाले माझ्याकडे माफीची मागणी करत आहे; पण माफी तर पंतप्रधान मोदी आणि त्यांचे असिस्टंट अमित शहा यांनी मागितली पाहिजे. या दोघांनी देशाची अर्थव्यवस्था नष्ट केली. सगळा पैसा तीन उद्योगपतींना दिला, असा आरोप राहुल गांधींनी केला.
n जीएसटी हा गब्बरसिंह टॅक्स लावून मोदींनी अर्थव्यवस्था बरबाद केली. 45 वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारी आज देशात आहे. विकासदर 4 टक्क्यांवर आला आहे, असे ते म्हणाले.
n सत्तेसाठी मोदी काहीही करू शकतात. देशाचे काहीही होवो, त्यांना फक्त पब्लिसीटी पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले.

आरपारचा निर्णय घेण्याची वेळ – सोनिया गांधी
देश वाचवायचा असेल तर, आपल्याला कठोर संघर्ष करावा लागेल. आरपारचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितले. यावेळी सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर टिकास्त्र्ा सोडले. सबका साथ, सबका विकास कुठे आहे? अर्थव्यवस्था उद्ध्वस्त का झाली? रोजगार कुठे गेले? अर्ध्या रात्री जीएसटी लागू केली; पण सरकारची तिजोरी रिकामी का झाली? रिझर्व्ह बँकेचा पैसा वापरला याची चौकशी व्हायला नको का? नोटाबंदीने काळा पैसा बाहेर का आला नाही? असे प्रश्न सोनिया गांधींनी उपस्थित केले. या मेळाव्यात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणावर टीका केली.

आपली प्रतिक्रिया द्या