सरकारडून फक्त तात्पुरती मलमपट्टी, इंदूरच्या दूषित पाण्यावरून राहुल गांधी यांची टीका

इंदूर (मध्य प्रदेश) येथे भगिरथपुरा परिसरातील दूषित पाण्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांची भेट घेत राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार असलेल्या राहुल गांधी यांनी या भागातील पाण्याच्या टाकीसमोर उभे राहून परिस्थितीवर भाष्य केले.

राहुल गांधी म्हणाले की, “ही पाण्याची टाकीच या भागात अजूनही स्वच्छ पाणी उपलब्ध नसल्याचे प्रतीक आहे. सध्या केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे, जी काही दिवसच टिकेल. एकदा या भागाकडील लक्ष हटले की परिस्थिती पुन्हा जैसे थे होईल.” येथील नागरिक काहीही अवाजवी मागणी करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “या लोकांची मागणी केवळ इतकीच आहे की येथे नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपी काम व्हावे आणि त्यांना स्वच्छ पाणी मिळावे. सरकारने आपली जबाबदारी पार पाडावी, एवढीच त्यांची अपेक्षा आहे,” असे ते म्हणाले.

आपल्या भेटीचा उद्देश स्पष्ट करताना राहुल गांधी यांनी सांगितले की, “मी आज येथे या लोकांच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आलो आहे. त्यांच्या मागण्या रास्त आहेत आणि त्यांना न्याय मिळायलाच हवा.” दूषित पाण्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला तातडीने ठोस उपाययोजना करण्याचे आवाहन केले.