
लोकसभेसह महाराष्ट्र व हरयाणाची निवडणूक चोरली गेल्याचा आरोप करणारे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज बॉम्ब फोडला. भाजप व निवडणूक आयोगाच्या संघटित फ्रॉडचा त्यांनी पर्दाफाश केला. राहुल गांधी यांनी मतचोरीच्या पुराव्यांचा सात फुटांचा ढीगच देशाला दाखवला. ‘पॉइंट टू पॉइंट’ प्रेझेंटेशन मीडियासमोर केले. बोगस मतदार, बनावट पत्ते, फसवे फोटो सगळे चव्हाट्यावर आणले. राहुल यांच्या या हल्ल्यानंतर आयोगाची गाळण उडाली असून आयोगाने त्यांना भेटीसाठी बोलावले आहे.
नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात ‘इंदिरा भवन’ येथे सुमारे सवा तासाच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी निवडणूक घोटाळय़ाचा लेखाजोखा मांडला. बेंगळुरू मध्य लोकसभा मतदारसंघाचे उदाहरण देत राहुल यांनी मतदार याद्यांतील घोळ व निकालाच्या आकडेवारीतील संशयास्पद तफावत मांडली. ते पाहून सगळेच अवाप् झाले.
लोकांसमोर जे बोललो, तेच शपथपत्र!
राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया दिली. राहुल यांनी आरोप सिद्ध करण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर पुरावे सादर करावे, असे आयोगाने सांगितले. त्यावर राहुल यांनी तात्काळ उत्तर दिले. मी लोकांसमोर जे बोललो तेच माझे शब्द आहेत, तेच माझे प्रतिज्ञापत्र समजा, असे आयोगाला सुनावले.
निवडणूक आयोगाने दिली भेटीची वेळ
निवडणूक आयोगाने काँग्रेसला मतदार यादीतील घोळाचे पुरावे सादर करण्यासाठी व त्यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी दुपारी 1 ते 3 दरम्यानची वेळ दिली आहे. त्यानुसार, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे शिष्टमंडळ शुक्रवारी निवडणूक आयोगाची भेट घेण्याची शक्यता आहे.
चोरीचा संशय कसा बळावला?
लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये 28 पैकी 16 जागा मिळतील अशी अपेक्षा काँग्रेसला होती. प्रत्यक्षात 9 जागा मिळाल्या. या पराभवाचे विश्लेषण करताना बेंगळुरू मध्य मतदारसंघात निकालाने संशय बळावला. या मतदारसंघात काँग्रेसचे मन्सूर अली खान यांचा 32,707 मतांनी पराभव झाला होता. एकूण मतदारांची 13 लाख ही संख्या पाहता हा निसटता पराभव होता. मन्सूर अली खान व भाजपचे पीसी मोहन या दोघांनाही 6 लाखांच्यावर मते मिळाली होती. त्यांच्यातील फरक केवळ 2.58 टक्के मतांचा होता. हे सगळे कसे झाले हे सांगण्यासाठी राहुल यांनी या लोकसभेतील महादेवपुरा विधानसभेचे उदाहरण दिले.
मत-चोरीचे पाच प्रकार
राहुल यांनी मतचोरीचे पाच प्रकार सांगितले. त्यात बनावट मतदार, बनावट व चुकीचे पत्ते, एकाच पत्त्यावर अनेक मतदार, अवैध पह्टो आणि फॉर्म 6 चा गैरवापर असे ते पाच प्रकार आहेत.
डय़ुप्लिकेट मतदार
डय़ुप्लिकेट मतदारांचे उदाहरण देताना राहुल यांनी गुरकिरत सिंह डांगचे उदाहरण दिले. मतदार यादीत या व्यक्तीचे नाव चार वेगवेगळय़ा ठिकाणी होते. महादेवपुरात अशी नावे 11,965 आहेत, असे ते म्हणाले.
एक पत्ता, शेकडो मतदार
एकाच पत्त्यावर अनेक मतदार राहत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. 470 क्रमांकाच्या बुथवरील एका यादीत असलेल्या पत्त्यातील 35 नंबरच्या खोलीत 80 मतदार आढळले. आणखी एका पत्त्यावर 46 मतदारांची नोंद होती. अशा प्रकारचे एकूण 10,452 मतदार आढळले.
बनावट पत्ते
बेंगळुरू मध्य मतदारसंघात 40,009 मतदारांचे पत्ते बनावट होते. तिथे कोणीही राहत नव्हते. मग त्यांच्या नावे मतदान कोणी केले?
बोगस फोटो
तब्बल 4132 मतदारांचे मतदान ओळखपत्रावरील फोटो ओळखताही येत नव्हते. हे तपासले का गेले नाही आणि या लोकांनी मतदान कसे केले?
भाजपने लोकसभेच्या 25 जागा चोरल्या
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या भाजपला बहुमत मिळाले नाही. काही पक्षांच्या पाठिंब्यावर त्यांचे सरकार आहे. भाजपला आणखी 25 जागा कमी पडल्या असत्या तरी त्यांचे सरकार आले नसते. निकाल मॅनेज करून आलेले हे सरकार आहे. तुम्हा-आम्हाला प्रिय असलेली लोकशाही राहिलेली नाही. त्यामुळे न्यायालयाने या सगळय़ात हस्तक्षेप करण्याची गरज आहे, असे राहुल म्हणाले. भाजपने पुन्हा सत्तेत येण्यासाठी 25 जागा चोरल्याचे पुरावे राहुल यांनी दिले.
येथे अंपायर अर्थात निवडणूक आयोगच भाजपच्या टीममधून खेळतोय. जोपर्यंत हा अंपायर निष्पक्षपणे काम करणार नाही तोपर्यंत निवडणुका ईव्हीएमने घ्या किंवा मॅन्युअली घ्या काहीच फरक पडणार नाही.
1 सत्ताविरोधी लाटेचा भाजपवर परिणाम होत नाही, इतर पक्षांवरच कसा होतो?
2 तंत्रज्ञान नसताना निवडणुका लवकर व्हायच्या, आता महिना लागतो. त्या एकाच दिवशी का घेत नाही?
3 महाराष्ट्रात संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मतदान का आणि कसे वाढले?
4 निवडणूक आयोग इलेक्ट्रॉनिक डेटा का देत नाही?
फॉर्म 6 आणि 70 वर्षांची शकुन राणी
नवे आणि तरुण मतदार नरेंद्र मोदींना मतदान करतात असे सांगितले जाते. फॉर्म 6 च्या माध्यमातून नवीन मतदार नोंद केले जातात. या नव्या मतदारांमध्ये पहिले नाव शकुन राणी यांचे आहे. त्या 70 वर्षांच्या आहेत. अशा प्रकारे 33,692 मतदारांनी मतदान केले. या नव्या मतदारांची वये 98, 96, 95 अशी आहेत. शकुन राणी यांनी तर दोनदा हा फॉर्म भरला होता. एका ठिकाणी त्यांचा क्लोजअप पह्टो आहे तर एक पह्टो दुरून काढलेला आहे.
महाराष्ट्रात 40 लाख संशयित मतदार
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने सर्वाधिक जागा जिंकल्या. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला. या मधल्या काळात राज्यात तब्बल एक कोटी मतदार वाढले. त्यातील 40 लाख संशयित आहेत. असाच प्रकार हरयाणातही झाला.
एकाच मतदाराचे तीन राज्यांत मतदान
एकाच माणसाने दोन-दोन, तीन-तीन राज्यांत मतदान केल्याचीही उदाहरणे राहुल यांनी दिली. आदित्य श्रीवास्तव नावाच्या एका व्यक्तीने महाराष्ट्र, कर्नाटक, यूपीमध्ये मतदान केले, तर विशाल सिंह नावाच्या एकाने कर्नाटक आणि वाराणसीत मतदान केले. अशा प्रकारे 11,965 मतांची चोरी झाली.
गठ्ठय़ात लपलेय सत्य
आयोगाने दिलेली मतदार यादी मशीनच्या मदतीने वाचण्यायोग्य नव्हती. स्पॅन होत नव्हती. चोरी पकडली जाऊ नये म्हणूनच आयोगाने हे केले.
वेगवेगळय़ा कागदपत्रांची मॅन्युअली तपासणी करून आम्ही चोरीचे पुरावे गोळा केले.
महादेवपुरात ‘लाख’ लफडी
संपूर्ण लोकसभा मतदारसंघात दोन्ही उमेदवार बरोबरीत असताना महादेवपुरात भाजपच्या उमेदवाराला एक लाखांची आघाडी मिळाली. तिथेच निकाल फिरला. या मतदारसंघात 11,965 मतदार चुकीच्या पद्धतीने दाखवले होते. 40,009 मतदारांचा पत्ता बोगस होता. एकाच पत्त्यावर 10,452 मतदार होते. फसवे पह्टो 4,132 आणि फॉर्म 6 चा गैरवापर करून 33,692 नवे मतदार घुसवले.