
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मायावतींना सोबत घेण्याची तयारी दर्शविली होती. मात्र ईडी, सीबीआय यांसारख्या पेंद्रीय तपास यंत्रणाचा दबाब आणि भीतीपोटी बसपा नेत्या मायावती यांनी उत्तर प्रदेशची निवडणूक लढवली नाही, असा दावा कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
माजी सनदी अधिकारी आणि कॉँग्रेस नेते के. राजू यांच्या ‘द दलित टथः द बॅटल्स फॉर रियलायजिंग आंबेडकर्स व्हिजन’ या पुस्तकाचे प्रकाश राहुल गांधी यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी राहुल गांधी म्हणाले, काँग्रेसने मायावतींना मुख्यमंत्री बनवण्याची तयारी दर्शवली होती. तसा निरोपदेखील त्यांच्यापर्यंत पोहचवण्यात आला होता; परंतु केंद्रीय तपास यंत्रणांच्या दहशतीमुळे त्यांनी निरोपाला साधे उत्तरदेखील दिले नाही.
संविधान लागू करण्याची जबाबदारी असलेल्या संस्थांशिवाय संविधानाचे महत्त्व नाही; परंतु आता देशातील सर्व संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हातात आहेत. त्यामुळे मायावती ईडी, सीबीआयच्या दहशतीखाली आहेत. कांशीराम यांनी दलितांना आवाज दिला. त्यांना जागृत केले, परंतु आज दलितांसाठी मायावती लढताना दिसत नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
मला सत्तेत स्वारस्य नाही
राजकारणी सत्तेच्या शोधात असतात, सत्तेचा विचार करत असतात. पण मी सत्तेच्या वर्तुळात वाढलो. त्यामुळे मला सत्तेत स्वारस्य नाही. त्या ऐवजी देश समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
एक प्रकारे मी भिकारीच आहे, कारण माझ्या देशाने मला विनाकारण प्रेम दिले आहे. मी त्यांचा ऋणी आहे. मी रोज सकाळी उठतो आणि विचारतो की मला देशाकडून मिळालेलं हे प्रेम कसं परत करायचं?, देशाने मला केवळ प्रेमच दिले नाही, तर देशाने मला जोडेदेखील मारले. असं का होतंय? तर देश मला काही तरी शिकवतोय हेच उत्तर यातून मला मिळालं असल्याचे राहुल गांधी म्हणाले.



























































