मतचोरी… घुसखोरी… निवडणुकीच्या निष्पक्षतेवरून राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाच राज्यांच्या विधानसभा निकालानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर हल्ला चढवला आहे. लोकसभेतील भाजपचा प्रत्येक सहावा खासदार हा मतचोरी करून निवडून आलेला आहे. त्यामुळे भाजपच्याच भाषेमध्ये त्यांनी घुसखोर का म्हणू नये? असा बोचरा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. तत्पूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करून भाजपने जवळपास 100 जागा चोरल्याचा आरोप केला होता.

मतचोरी करून कधी जागा चोरल्या जातात, तर कधी संपूर्ण सरकारच चोरले जाते. लोकसभेतील 240 भाजप खासदारांपैकी प्रत्येक सहावा खासदार मतचोरीने जिंकला आहे. त्यांना ओळखणे अवघड नाही. भाजपच्या भाषेत त्यांना ‘घुसखोर’ म्हणावे का? आणि हरयाणामध्ये तर संपूर्ण सरकारच घुसखोर आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी बुधवारी एक्सवर पोस्ट करून केली.

जे घटनात्मक संस्थांना आपल्या खिशामध्ये ठेवतात. जे मतदार याद्या आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये फेरफार करतात, ते स्वत:च ‘रिमोट कंट्रोल’ने चालतात. भाजपला सत्याची भीती वाटते. जर आज देशात पूर्णपणे निष्पक्ष निवडणुका झाल्या, तर भाजपला 140 जागा जिंकणेही कठीण जाईल, असा दावाही राहुल गांधी यांनी केला.

पश्चिम बंगाल-आसामची निवडणूक चोरली!

निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपने पश्चिम बंगाल व आसाममधील निवडणूक चोरली आहे. आम्ही ममता बॅनर्जी यांच्याशी सहमत आहोत. पश्चिम बंगालमध्ये भाजपने 100 हून अधिक जागा चोरल्या आहेत. आपण हा खेळ मध्य प्रदेश, हरयाणा, महाराष्ट्र आणि 2024 च्या लोकसभा निवडणूकीतही पाहिला आहे. निवडणूक चोरा, संस्था चोरा याशिवाय भाजपकडे काही पर्यायच नाही”, अशी टीका राहुल गांधी यांनी एक्सवरून केली आहे.

निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपने आसाम आणि बंगालची निवडणूक चोरली, राहुल गांधी यांची टीका