…तर हरिभाऊ राठोड तिथे पूजा करायला गेले होते का? विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचा उफराटा सवाल

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी निवडणूक कार्यालयात गोंधळ घातला. माझ्याशी पंगा कशाला घेताय, असे म्हणत माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनाही धमकावले. तसेच त्यांची सुरक्षा काढण्याचे आदेश सहपोलीस आयुक्तांना दिले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे अडचणीत आलेल्या नार्वेकर यांनी माझे निवडणूक केंद्रावर जाणे अयोग्य होते, तर हरिभाऊ राठोड तिथे पूजा करायला गेले होते का? असा उफराटा सवाल आता केला आहे.

कुलाबा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कार्यालयात राहुल नार्वेकर आणि हरिभाऊ राठोड यांच्यात 30 डिसेंबर रोजी जोरदार खडाजंगी झाली. यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधताना नार्वेकर म्हणाले, मी पोलिंग स्टेशनवर जाणे अयोग्य होते, तर हरिभाऊ राठोड तिकडे कशासाठी गेले होते? ते तिकडे पूजा करण्यासाठी गेले होते का? असा सवाल केला. व्हायरल झालेल्या व्हिडीओत कोण वाद घालत होते, कोण त्या ठिकाणी आम्ही येथून निवडणूक निर्णय अधिकाऱयांना बाहेर पडू देणार नाही, तुम्हाला हलू देणार नाही हे कोण बोलत होते हे व्हिडीओत पाहिल्यावर स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. लोकप्रतिनिधी म्हणून कुणी आपल्याला मिळालेल्या सुरक्षेचा गैरवापर करत असेल तर संबंधित अधिकाऱयांना त्याची माहिती देऊन त्यासंबंधी कारवाई करण्याची सूचना करणे हे माझे कर्तव्य आहे, असे नार्वेकर म्हणाले.

मी नियमात राहूनच तिकडे गेलो होतो

आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील नगरसेवकांसोबत जाऊन अर्ज भरला. मी पण कुलाब्याचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे मीसुद्धा माझ्या भागातील नगरसेवक व उमेदवारांसोबत जाऊन त्यांचा फॉर्म भरणे हे स्वाभाविकच आहे. त्यानुसार मी तिकडे गेलो होतो. निवडणूक आयोगाचा नियम आहे की, एका उमेदवारासोबत 2 प्रतिनिधी जाऊ शकतात. त्यानुसार नियमात राहूनच मी तिकडे गेलो होतो, असे नार्वेकर म्हणाले.