जिंकलो तर गरिबांना वर्षाला 72 हजार रुपये देऊ- राहुल गांधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rahul-gandhi

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘न्याय स्किम’च्या माध्यमातून गरिबी हटावचा नारा दिला आहे. सत्तेत आल्यास महिन्याला 12 हजार रुपयांहून कमी उत्पन्न असणाऱ्या 20 टक्के गरिबांना दरवर्षी 72 हजार रुपये देण्यात येतील, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी यांच्या स्कीममुळे दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ‘गरिबी हटाव’च्या घोषणेची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

राहुल गांधी यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन या स्कीमची माहिती दिली. मी आज करत असलेल्या घोषणेमुळे तुम्ही चकीत व्हाल, असे म्हणत त्यांनी ही स्कीम समजावून सांगितली. या स्कीमबाबत अर्थतज्ज्ञांशी विचार विनिमय केला असून या योजनेचा देशातील 5 कोटी कुटुंबातील 25 कोटी लोकांना लाभ मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या पाच वर्षात देशातील गोरगरिबांची फसवणूक झाली आहे. देशातील जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. मात्र आता देशात आमचं सरकार आल्यास ‘न्याय स्किम’च्याद्वारे कमकुवत घटकातील लोकांचे मासिक उत्पन्न 12 हजार रुपये करण्यात येईल. म्हणजे एखाद्या व्यक्तिला महिन्याला 8 हजार रुपये पगार मिळत असेल तर सरकारच्यावतीने त्याला आणखी 4 हजार रुपये दिले जातील. अशा तऱ्हेने त्यांचे मासिक उत्पन्न 12 हजार रुपयांवर नेले जाईल. त्याचा देशातील 25 कोटी जनतेला थेट फायदा होईल, असे त्यांनी सांगितलं.