चाकुरात बनावट दारू निर्मिती अड्ड्यावर धाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका लॉजमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून बनावट दारू तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या गोदामातील लाखो रुपये किंमतीचे जवळपास पाच टेम्पो साहित्य मंगळवारी दुपारी जप्त करण्यात आले.

लातूर – नांदेड रस्त्यावर अनेक दिवसांपासून बंद असलेल्या लॉजवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मंगळवारी, 5 एप्रिल रोजी दुपारी छापा टाकला. या लॉजमधील गोदामात बनावट दारू तयार करण्यासाठी लागणाऱ्या बाटल्या, स्टीकर, सील, रिकामे खोके हे साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून आले. दोन दिवसांपासून पथकातील कर्मचारी यावर लक्ष ठेवून होते. बनावट दारू तयार करण्यासाठी हे साहित्य जमा केले असल्याचा अंदाज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

याचे मोजमाप करून हे साहित्य जप्त करण्यात आले आहे. जवळपास पाच टेम्पो भरतील एवढे हे साहित्य मिळून आले असून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक गणेश बारगजे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. हे साहित्य कोणाचे आहे याबाबत खात्री करून गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सांगितले. यातून बनावट दारू विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस येऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या धाडीत मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या, बनावट दारू तयार करण्यासाठी लागणाऱ्या रिकाम्या बाटल्या, स्टीकर, सील, रिकामे खोके आदी साहित्य आढळून आले असून याची मोजणी सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले.

या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत गुन्हा नोंद व कसलीच कारवाई केली नसल्याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. यामुळे चाकुरात दिवसेंदिवस अवैध धंद्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि याकडे पोलीस प्रशासन डोळेझाकपणा करीत असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.