लोक अदालतीत रायगड जिल्‍हा राज्‍यात दुसरा; 7 कोटींहून अधिक रकमेची वसुली

26

सामना प्रतिनिधी । अलिबाग

रायगड जिल्‍हयात शनिवारी आयोजीत करण्‍यात आलेल्‍या लोक अदालतीमध्‍ये 7 कोटी 18 लाख 89 हजार 11 रूपयाची वसुली करण्‍यात आली असून प्रलंबीत प्रकरणे निकाली काढण्‍यात रायगड जिल्‍हा राज्‍यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

न्‍यायालयात प्रलंबित प्रकरणांचा निपटारा तात्काळ व्हावा यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देशभर 13 जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग जिल्हा न्यायालयातील लोक अदालतीमध्ये मार्गदर्शन व कामकाजाची पाहणी करण्यासाठी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश रायगड अलिबाग व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्‍यक्ष अभय वाघवसे तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जयदीप मोहीते उपस्थित होते.

या लोक अदालतीमध्ये भुसंपादन, मोटार अपघात, विवाह, तडजोडपात्र फौजदारी, दिवाणी व फौजदारी अपिले, सहकार न्यायालय व कामगार न्यायालय, बँका, भारत दूरसंचार निगम (टेलीफोन), ग्रामपंचायत, नगरपालिका अशी अनेक प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. या लोकअदालतीमध्ये कामकाज पाहण्यासाठी रायगड जिल्ह्यातून 33 कक्षांचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच राष्ट्रीयकृत बँका, टेलिफोन कंपनी, महावितरण, विमा कंपन्या, भुसंपादन यांचे अधिकारी आणि सर्व पक्षकारांनी तडजोडीमध्ये पुढे येवून सहभाग नोंदवला. न्यायीक अधिकारी, जिल्हा विधिज्ञ मंडळ, विधी स्वयंसेवक, कर्मचारी यांनीही राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. जिल्ह्यात न्यायालयातील 2 हजार 919 प्रलंबित प्रकरणांपैकी 425 प्रकरणात तडजोड होवून 4 कोटी 74 लाख 76 हजार 251 रुपयांची वसुली करण्यात आली.

भुसंपादनाची 124 प्रकरणे निकाली लागली. मोटार अपघात दाव्यांच्या 181 प्रकरणापैकी 62 प्रकरणे निकाली लागुन 3 करोड 61 लाख 3 हजार पाचशे 73 रुपयांची रक्कम मान्य करण्यात आली. 79 हजार 956 दाखलपुर्व प्रकरणांमध्ये 16 हजार तिनशे 23 प्रकरणात तडजोड होवून 2 कोटी 41 लाख 12 हजार 760 रुपयांची वसुली झाली आहे. विशेष बाब म्हणजे जिल्ह्यातील सर्वाधिक प्रकरणांचा निपटारा करुन लोकअदालत प्रकरणे निकाली लावण्यामध्ये रायगड जिल्ह्याने महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक मिळवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या