
पावसाळ्यात वीज पडुन हकनाक होणारी जीवितहानी आता टाळता येणे शक्य होणार आहे. रायगड जिल्ह्यात 980 ग्रामपंचायत हद्दीत वीज प्रतिरोधक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत ही योजना आखण्यात आली आहे. यासाठी योग्य ठिकाणे निवडण्याचे काम सुरु झाले आहे. राज्य शासनाकडे याबाबत प्रस्ताव पाठविला असून केंद्र सरकारकडून त्यास मंजुरी घेतली जाणार आहे. सध्या हा प्रकल्प पहिल्या स्टेजवर आहे.
रायगड जिल्हा हा चक्रीवादळ प्रभावी क्षेत्रात येत असल्याने दरवर्षी होणारे नुकसान कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. भूमिगत विद्युतीकरण, किनारपट्टीलगत झाडांची लागवड, चक्रीवादळ निवारा केंद्र अशा योजना राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत आहेत. वीज प्रतिरोधक यंत्रणा हा देखील याचाच एक भाग आहे.
अतिवृष्टी पावसात विजांचा कडकडाटात मोठ्या प्रमाणात होत असल्याने जिल्ह्यात विविध भागात वीज कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. त्यामध्ये दरवर्षी वीज अंगावर पडून सरासरी दोन नागरिकांचा हकनाक बळी जात असतो. पाळीव जनावरांचाही हकनाक बळी जाण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. यावर्षीच्या मान्सूनमध्ये एकूण चार जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. वीज प्रतिरोधक यंत्रणेच्या आधुनिक तंत्राने हे प्रमाण टाळता येणे शक्य होणार आहे. वीज पडण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी वीज प्रतिरोधक यंत्रणा बसवण्यासाठी अल्प स्वरुपात खर्च येणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालये, शाळा इमारती, पाण्याच्या टाक्या, डोंगरावर उंच ठिकाणी बांधलेली घरे, मंदिरे, उच्च दाबाच्या वीज वाहिनी टॉवर अशा ठिकाणी ही यंत्रणा बसवण्यात येणार असल्याचे समजते. अतिवृष्टी आणि विजांच्या कडकडाटात अनेक वेळा वीज कोसळण्याच्या घटना घडत असतात. अशावेळी वीज प्रतिरोधक यंत्रणा कार्यन्वित केल्यास पडणारी वीज ही आपल्याकडे खेचून घेऊन होणारी जीवितहानी टाळता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे वीज पडण्याच्या घटना कमी होऊन नुकसान टाळता येणे शक्य होणार आहे.
ही योजना प्राथमिक स्वरुपात आहे. या संदर्भात अहवाल मागविण्यात आला आहे. त्यानुसार निवड होणाऱ्या ठिकाणी ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. मोठ्या ईमारती, कारखाने, मोबाईल टॉवर अशा ठिकाणी अशी यंत्रणा बसवलेल्या असतात. राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत ही यंत्रणा विस्तृत परिसरात बसवली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव हा राज्य शासनाकडे पाठविला आहे. – सागर पाठक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रायगड



























































