
सामना ऑनलाईन । अलिबाग
कुणाची वस्तू चोरी जाते.. कुणाचे पैसे चोरीला जातात.. कपडेही चोरीला जातात.. पण रायगडात चक्क एक अख्खं गाव चोरीला गेल्याची घटना घडली आहे. माणगाव तालुक्यातील महाराणा प्रतापनगरात राहणाऱया रहिवाशांनी मुला-बाळांसह आज चक्क पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांचे गाव चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे. आमचे गाव शोधून द्या.. म्हणजे आमची शेतीही मिळेल, अशा अजब-गजब मागणीमुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत.
गाव सापडले की शेतीही सापडेल..
भटकंती थांबावी ही आमच्या समाजाची इच्छा आहे. आम्हाला स्वतःची घरे बांधायची आहेत, घर बांधण्यासाठी जागा घ्यायची आहे, पण आम्हाला शेतकरी दाखला मिळत नाही. आम्ही जागा घेऊ नये आणि घर बांधू नये हीच सरकारची इच्छा आहे काय? असा संतप्त सवाल बेलदार समाजाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला. आमचे हरवलेले गाव सापडले की त्या गावात आमची शेतीही सापडेल. मग आम्हाला शेतकरी असल्याचा दाखला मिळेल. मग आमचा समाज कुठेही जागा घेऊन हवं तसं घर बांधेल. आमच्यावर अतिक्रमण करण्याची वेळ येणार नाही, अशी व्यथाही त्यांनी यावेळी मांडली.
माणगावातील महाराणा प्रतापनगरात बेलदार समाजाची अनेक कुटुंबे राहतात. भटकंती करत येथे स्थायिक झालेल्या बेलदार समाजातील कुटुंबांनी येथे सरकारी जमिनीवर त्यांनी तात्पुरता निवारा उभारला आहे, परंतु या जमिनी ताब्यात घेऊन या कुटुंबांना तेथून हुसकावण्यात येणार आहे. त्यामुळे या रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट उडाली आहे. कुटुंबकबिल्यासह त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांचे गाव चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली आहे.

-आमच्याकडून मूळ गावचा पुरावा मागता, मग ते कुठेतरी असेलच..
बेलदार समाज हा भटका समाज असून दगड फोडणे, बांधकामावर मोलमजुरी करणे हाच त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. या व्यवसायामुळे अनेक पिढय़ांचे आयुष्य भटकण्यातच गेले. जिथे व्यवसाय तिथेच बिऱ्हाड. यामुळे या भटकंतीत बेलदार समाजाचे मूळ गावच हरवले आहे. मुलांचे शिक्षण, जातीचा दाखला द्यावा लागतो. त्या दाखल्यासाठीही 1961 चा पुरावा लागतो. जागा घेऊन घर बांधायचे असेल तर शेतकरी असल्याचा दाखला द्यावा लागतो. त्यामुळे बेलदार समाज ना घर बांधू शकत ना शिक्षण घेऊ शकत. सरकार ज्याअर्थी आमच्याकडून मूळ गावचा पुरावा मागत आहे त्याअर्थी महाराष्ट्रात कुठेतरी आमचे मूळ गाव आहे आणि तेच हरवले आहे. म्हणून पोलिसांनी आमचे चोरीला गेलेले गाव शोधून द्यावे आणि न्याय द्यावा, अशी मागणी बेलदार समाजाच्या रोहिदास मोहिते, कुमुदिनी चव्हाण, रामू पवार, भारत पवार, सुनील पवार, हनुमान मोहिते, शशिकांत मोहिते, रोहिदास चव्हाण, संताजी पवार यांनी माणगाव पोलिसांकडे केली आहे.































































