रेल्वेचे पारदर्शक हायस्पीड विस्टाडोम कोच तयार, टुरिस्ट डब्यांच्या नव्या डिझाईनची चाचणी यशस्वी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणच्या निसर्गसौंदर्याचा आनंद मनमुराद लुटण्याची संधी देणाऱया रेल्वेच्या पारदर्शक अशा विस्टाडोम टुरिस्ट कोचच्या नव्या डिझाईनची वेग चाचणी नुकतीच आयसीएफने यशस्वी केली आहे. चेन्नईच्या आयसीएफ कारखान्याने या नव्या डब्यांची निर्मिती केली असून हे डबे प्रवाशांच्या दृष्टीने अधिक आरामदायी आणि आधुनिक करण्यात आले आहेत.

विस्टाडोम कोचचे नवीन डिझाईन चेन्नईच्या इंटेग्रल कोच फॅक्टरीने गेल्या महिन्यात तयार केले असून या कोचची दरताशी 180 कि.मी. वेगावर कंपन चाचणी घेण्यात आली असून ती यशस्वीपणे पार पडली आहे. विस्टाडोम कोचला मोठय़ा काचेच्या खिडक्या असून काचेचे छत आहे तसेच निसर्ग निरीक्षणासाठी वेगळा लाऊंज असून 180 डिग्री कोनातून फिरणाऱया आसनांची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना कोकण, सह्याद्रीच्या रांगा, दार्जिलिंग, हिमाचल प्रदेशातील निसर्गाचा प्रवासात बसल्या जागी अनोखा नजारा दिसणार आहे.

हे विस्टाडोम कोच केवळ टुरिस्ट लोकेशनवर जेथे प्रवाशांना निसर्गाचा आनंद मनमुरादपणे लुटायचा आहे, तेथेच हे डबे ट्रेनला जोडले जाणार आहेत. त्यामुळे प्रवासाचा आनंद द्विगुणित होणार आहे. त्यापैकी काही ठिकाणांची यादी खालील प्रमाणे आहे.

दादर आणि मडगाव
माथेरान हील रेल्वे
अरापू व्हॅली
कश्मीर व्हॅली
दार्जिलिंग हिमालयन रेल्वे
कालका-सिमला रेल्वे
कांगरा व्हॅली रेल्वे
निलगिरी माऊंटन रेल्वे

काचा तुटण्याची भीती नाही

विस्टाडोम टुरिस्ट कोचमध्ये प्रवाशांना निरीक्षणासाठी अधिक जागा उपलब्ध करण्यात आली असून छतालाही काचा बसविण्यात आल्या आहेत. या डब्यांत 44 आसनांची व्यवस्था करण्यात आली असून 180 डिग्री कोनातून फिरणाऱया खुर्च्या बसविण्यात आल्या असून त्या पाठी आणि ट्रेनच्या दिशेने पुढे दोन्ही दिशेने झटपट वळविता येतात. ब्रॉडगेज विस्टाडोम कोचच्या काचेच्या खिडक्यांना लॅमिनेटेड ग्लास शीट्स वापरण्यात आली असून त्यामुळे काचा फुटण्याची भीती राहत नाही.