चार वर्षांत रेल्वे प्रवाशांना लुटणारे 73 हजार तृतीयपंथी अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गेल्या चार वर्षांत देशभरातून रेल्वे प्रवाशांची लूट करणाऱ्या 73 हजार तृतीयपंथीयांवर रेल्वे प्रशासनाने कारवाई केली आहे. गेल्या वर्षभरात 20 हजार तृतीयपंथीयांना प्रवाशांची लूट करणे, त्यांच्याशी भांडणे करण्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने एका माहिती अधिकार अर्जाला उत्तर देताना दिली आहे.

गेल्या काही वर्षांत रेल्वेच्या लांबपल्ल्याच्या गाडय़ा आणि लोकल ट्रेन्समध्ये तृतीयपंथीयांनी घुसखोरी करीत प्रवाशांची लूट आणि त्यांना मारहाण केल्याच्या तक्रारी मोठय़ा संख्येने दाखल झाल्या होत्या. त्यानंतर अनेक माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी याप्रकरणी रेल्वे मंत्रालयाकडून माहितीची मागणी केली होती. रेल्वे सुरक्षा बलाचे (आरपीएफ) जवान वरचेवर चालत्या ट्रेनमध्ये विशेष सुरक्षा मोहीम राबवत असल्यामुळे प्रवाशांच्या लुटींचे प्रकार कमी झाल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.

रेल्वे सुरक्षा हा राज्यांचा विषय

रेल्वे गाडय़ांतील प्रवाशांच्या सुरक्षेचा विषय हा त्या त्या राज्यांच्या अखत्यारीतला विषय असल्याचे सांगून धावत्या गाडय़ांमधील गुन्हेगारी, विशेषतः तृतीयपंथीयांकडून होणारी प्रवाशांची लूट रोखण्यासाठी रेल्वेने आरपीएफची विशेष दक्षता पथके नियुक्त केली आहेत, असेही रेल्वे मंत्रालयाने जाहीर केले. 2015 ते जानेवारी 2019 या काळात रेल्वे पोलिसांनी 73,837 तृतीयपंथीयांना रेल्वे प्रवाशांना लुटल्याच्या अथवा त्यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. 2015 मध्ये 13, 546, 2016 मध्ये 19,800, 2017 मध्ये 18,526 तर 2018 मध्ये 20,566 तृतीयपंथी गुन्हेगारांना रेल्वे प्रवाशांची लूट केल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले होते, असेही रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.