लातूर रोड ते गुलबर्गा रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास मंजूरी; 42 लाख 50 हजाराची तरतूद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

लातूर रोड ते गुलबर्गा या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास मंजूरी मिळून त्याचे काम तात्काळ सुरू करावे असे निर्देश रेल्वे विभागाला देण्यात आले आहेत. 42 लाख 50 हजार रुपयांची तरतूद त्यासाठी करण्यात आली आहे.

विकासाला चालना मिळून ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात याकरीता पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी लातूर रोड ते गुलबर्गा हा 170 किमीचा रेल्वेमार्ग मंजूर व्हावा अशी मागणी सातत्याने लावून धरली होती. याबाबत अहमदपूर येथे झालेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेवेळी पालकमंत्री निलंगेकर यांनी पुन्हा एकदा या रेल्वेमार्गाच्या मंजुरीसाठी जाहीररित्या विनंती केली होती. अखेर पालकमंत्री निलंगेकरांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून लातूर रोड ते गुलबर्गा या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास मंजूरी मिळून त्याचे काम तात्काळ सुरू करावे असे निर्देश रेल्वे विभागाला देण्यात आले आहेत. हा निर्णय झाल्याबद्दल केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पालकमंत्री निलंगेकर यांनी आभार मानले आहेत.

या रेल्वेमार्गास मंजूरी मिळून त्याचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक यांना दिलेले आहेत. सदर 170 किमीचा रेल्वे मार्ग सुरू झाल्यास दक्षिण हिंदुस्थान उत्तर हिंदुस्थानला जोडला जाणार आहे. तसेच जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळून रोजगाराच्या संधीही प्राप्त होणार आहेत.