रेल्वेची राज्यांतर्गत लांबपल्ल्याची वाहतूक नेमकी केव्हा सुरू होणार, प्रवाशांमध्ये संभ्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मिशन बिगिन अगेन’ अंतगर्त अनलॉक – 5 नुसार राज्य सरकारने अनेक उपक्रमासोबतच रेल्वेच्या राज्यांतर्गत वाहतुकीला मंजुरी दिली असली तरी रेल्वेकडून रात्री उशिरापर्यंत अशी वाहतूक सुरू करण्यासंदर्भात कोणत्याही हालचाली न झाल्याने सर्वसामान्य प्रवासी बुचकळ्यात सापडले आहेत.

लॉकडाऊन शिथील करताना 5 ऑक्टोबरपासून केंद्र आणि राज्य सरकारने अनलॉक-5 अंतर्गत रेस्टॉरंट, हॉटेलसह अनेक सेवा सुरू करण्यास मंजुरी देताना रेल्वेच्या इंटरसिटी गाडय़ा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला होता. तसेच पुण्यातील लोकल वाहतूकही सुरू करण्याचे संकेत दिले होते. मात्र, यासंदर्भात रेल्वेकडून मात्र रविवारी कोणत्याही सूचना न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

गेल्या सहा ते सात महिन्यांपासून रेल्वेची पॅसेंजर सेवा बंद आहे. रेल्वेने सुरुवातीला 1 जूनपासून 200 मेल-एक्स्प्रेस सुरू केल्या होत्या. आता देशभरात 310 विशेष पॅसेंजर गाडय़ा सुरू आहेत. परंतु त्यात महाराष्ट्रात अगदीच मोजक्याच गाडया सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारने अनलॉक-5 अंतर्गत मुंबई ते कोल्हापूर, सोलापूर, नागपूर आणि कोकणात लांबपल्ल्यांच्या गाडय़ा सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र, याबाबत रेल्वेने रविवार रात्री उशिरापर्यंत नव्या गाडय़ांसदर्भात कोणतीही घोषणा न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे राज्यांतर्गत लांबपल्ल्याची वाहतूक नेमकी केव्हा सुरू होणार असा सवाल निर्माण झाला आहे. राज्य सरकारने मुंबई उपनगरीय लोकलही 15 ऑक्टोबरपासून टप्पाटप्प्याने सुरू होणार असल्याचे म्हटले होते. यासंदर्भात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी अद्याप राज्य सरकारकडून तसा प्रस्ताव आला नसल्याचे म्हटल्याने लोकल बाबतही अजूनही संभ्रम आहे.